तंत्रज्ञान…जरा आवरा !
जगप्रसिद्ध ‘स्पेस एक्स’, ‘टेस्ला’ आणि आता ‘ट्विटर’ या आस्थापनांचे मालक इलॉन मस्क हे तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्रारंभी लोकांना अंतराळ भ्रमंतीची कल्पना मांडून ‘स्पेस एक्स’ हे अंतराळ क्षेत्रात खासगी आस्थापन चालू केले. चालकरहित चारचाकी वाहनाचा त्यांचा प्रयोग सध्या विविध चाचण्यांमधून जात आहे. आता ते एका नवीन प्रकल्पावर काम करत आहेत. त्याचे नाव आहे ‘न्यूरालिंक’ ! या प्रकल्पांतर्गत त्यांची मानवी मेंदूत मेमरी चीप बसवून त्याद्वारे मानवी मेंदू आणि मनुष्याच्या अन्य हालचाली नियंत्रित करण्याची योजना आहे. हे वेगळ्या भाषेत सांगायचे झाले, तर कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) विकसित करण्याचा भाग आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता हे सध्या संशोधकांसाठी आव्हानात्मक आणि रस घेण्याजोगे क्षेत्र आहे. न्यूनतम मानवी अथवा मानवी हस्तक्षेपाविना कृती पूर्ण होणे, हे यामध्ये साध्य आहे.
संगणक वापरणारे माकड
स्वत:च्या प्रयोगाच्या यशस्वीतेविषयी लोकांना अवगत करण्यासाठी मस्क यांनी काही दिवसांपूर्वी दोन माकडांचे व्हिडिओ प्रसारित केले होते. एका व्हिडिओत एक माकड ‘जॉयस्टिक’ (संगणकाच्या माऊससारखे कार्य करणारे यंत्र) वापरून एक व्हिडिओ गेम खेळत आहे, तर दुसर्या व्हिडिओमध्ये ‘एक माकड टंकलेखन करत आहे’, असे दिसत होते. ‘न्यूरालिंकचा उपयोग मानवी मेंदूत करून ज्या लोकांना पक्षाघात झाला आहे, त्यांचे अवयव पुन्हा कार्यान्वित करणे; ज्यांना मेंदूशी संबंधित अन्य आजार आहेत, त्यासाठी होऊ शकतो’, असा दावा मस्क करत आहेत. त्यांच्या एकूण या प्रकल्पाच्या मांडणीवरून असे लक्षात येते की, त्यांच्या विविध प्रयोगांचा उपयोग मानवी अवयवांचा उपयोग न करता मेंदूतील विशिष्ट संवेदना आणि त्यापुढे विचारांद्वारेच संगणक, भ्रमणभाष नियंत्रित करता यावेत, याकडे कल आहे अन् जे पुष्कळ गुंतागुंतीचे आहे !
मेंदूत चिप
मस्क यांचा भर केवळ विचार करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृती पूर्ण व्हावी यावर आहे. चिपद्वारे मानवी हालचाली, संवेदना ध्वनीमुद्रित करणे आणि त्यानुसार त्या कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये वैद्यकीय कारणांसाठी वा आजारामुळे मानवी शरिरातील कार्यरत होऊ न शकणारा भाग कार्यान्वित करणे येथपर्यंत ठीक आहे. त्यासाठी त्यांना यश येत असेल, तर त्यांच्या संशोधनाला शुभेच्छा आहेत ! भावभावना, संवेदना यांविषयी जे सूत्र आहे, त्यात असे धरून चालले की, विचारांची गती यंत्राने पकडली, तरी ते विचार योग्य कि अयोग्य ? हे ठरवणे अयोग्य विचार दुरुस्त करणे, विचारांचे मूळ असलेले स्वभावदोष आणि अहं नष्ट करणे यांविषयी यंत्र काही करू शकणार आहे का ? मस्क यांनी ‘ही चिप बसवल्यामुळे आजारी व्यक्तीच्या हालचाली निरोगी व्यक्तीपेक्षाही चांगल्या होतील; कारण विचारांची गती पकडून यंत्र चालेल’, असा दावा केला आहे. मानवाच्या विचारांची गती पाहिली, तर मनुष्याच्या मनात दिवसभरात सहस्रो विचार येतात. या सहस्रो विचारांचे नियमन, त्यावर नियंत्रण एका चिपला करणे शक्य होणार का ? वैज्ञानिक किंवा सर्वसाधारण असा विचार केला जातो की, विचार मेंदूतून निर्माण होतात. विचार करणारे अंतर्मन आणि बाह्यमन असे मनाचे स्वरूप वैज्ञानिकांना पहाता न आल्याने ‘स्थुलातून दिसणारा मेंदू हा विचार करणारा आहे’, असे धरून चालले जाते. असे एक वेळ ग्राह्य मानले, तरी मेंदूत कोणते विचार यायला पाहिजेत ? आणि कोणते नको ? यावर कुणाचे तरी नियंत्रण असणार आहे, तेथपर्यंत शास्त्रज्ञ पोचू शकलेले नाहीत. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमता सिद्ध करण्याचे प्रयत्न अयशस्वी होणार नाहीत का ?
वैज्ञानिक बुद्धीचे दुष्परिणाम
मनुष्याने कुठलीही शारीरिक हालचाल न करता केवळ मुद्रित केलेल्या संवेदनांच्या माध्यमातून कामे करायची, तर त्याचा आळस वाढणार नाही का ? त्यामुळे मानवी शरिराचे काही भाग गतीमान, तर काही निष्क्रीय अशी स्थिती होणार नाही का ? एकूणच काय तंत्रज्ञान मानवाला सुख देण्याच्या प्रयत्नात त्याला दु:खी करणार नाही ना ? चिपचा उपयोग पक्षाघाताच्या रुग्णांना झाला, तर काही टप्प्यापर्यंत ठीक आहे; पण पुढे काय ? मस्क यांच्या प्रयोगात ८ माकडांचा मृत्यूही झाला आहे, म्हणजेच वरकरणी छान वाटलेले हे काही सरळ सोपे नाही. चीन कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून सीमेवर लढू शकणार्या रोबोची निर्मिती करत आहे, ज्याचा उपयोग त्याला भारत-चीन सीमेवर करायचा आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये सौदीच्या राजांपैकी एकाने स्वत:चा अंगरक्षक म्हणून कुणी बंदुकधारी व्यक्ती नव्हे, तर एक धिप्पाड आणि २ पुरुष उंचीचा रोबो ठेवला आहे. हा रोबो एका वेळी अनेक कामे करू शकतो, तसेच त्याच्या जवळील बंदुकीतून सेकंदाला शेकडो गोळ्या सुटतात. टेस्लाच्या मानवरहित कारच्या भारतातील प्रयोगात कार अनियंत्रित झाली. पुणे येथे या चाचणीच्या वेळी अपघात झाला आणि त्यात काही ठार, तर काही घायाळ झाले. रोबो सैनिक आणि रोबो अंगरक्षक यांच्या संदर्भातील ‘प्रोग्रॅम’मध्ये काही पालट झाला, तर केवढा अनर्थ घडेल, याचा विचार का केला जात नाही ? म्हणजे काही वर्षांनी ‘मनुष्य बुद्धीचा वापर न केल्याने बुद्धू, तर यंत्र हुशार’, अशी परिस्थिती निर्माण होईल. जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडेमस याने वर्तवलेल्या एका भविष्यात ‘कृत्रिम बुद्धीमत्ता असणार्या रोबोची निर्मिती होईल आणि ते रोबो मानवजातीचा विनाश करतील’, असे म्हटले आहे. यातून शिकण्याचे तात्पर्य असे की, तंत्रज्ञानाला वेसण घातले नाही, तर ते अनियंत्रित होऊन मानवाचाच घात करू शकते, हे येथे लक्षात घ्यायला हवे.