दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
७ डिसेंबर २०२२ या दिवशी ‘दत्तजयंती’ आहे. त्या निमित्ताने….
‘समाजातील जवळजवळ प्रत्येकालाच अल्प-अधिक वाईट शक्तींचा त्रास असतो. वाईट शक्तींमुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास होतात, तसेच जीवनात इतर अडचणीही येतात. वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अडथळेही आणतात; पण दुर्दैवाने बहुतेक जण वाईट शक्तींच्या त्रासांविषयी अनभिज्ञ असतात. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी नामजप-साधना करणे, हाच प्रभावी उपाय आहे. वाईट शक्तींच्या त्रासांचे निवारण करणार्या उच्च देवतांपैकी एक म्हणजे दत्त. सध्या पूर्वीप्रमाणे कुणी श्राद्ध-पक्ष इत्यादी, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या अतृप्त लिंगदेहांमुळे आध्यात्मिक त्रास होतो. दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. दत्ताच्या नामजपामुळे अतृप्त पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्या त्रासाचे प्रमाण घटते.
कोणतीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘काळानुसार सध्या देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कोणत्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी सनातनच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले. त्यांतून हे नामजप सिद्ध (तयार) झाले आहेत. त्यामुळे हे नामजप केल्यास त्यांतून काळानुसार आवश्यक असे त्या त्या देवतेचे तारक अथवा मारक तत्त्व प्रत्येकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळण्यास साहाय्य होईल. दत्ताच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपांचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली १ साधिका आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला १ साधक सहभागी झाले होते. या चाचणीत पुढीलप्रमाणे एकूण ६ प्रयोग घेण्यात आले.
अ. तारक नामजपाचे ३ प्रयोग : चाचणीतील साधकांना दत्ताचा तारक नामजप लहान, मध्यम आणि मोठ्या आवाजात प्रत्येकी १ घंटा ऐकवण्यात आले.
आ. मारक नामजपाचे ३ प्रयोग : चाचणीतील साधकांना दत्ताचा मारक नामजप लहान, मध्यम आणि मोठ्या आवाजात प्रत्येकी १ घंटा ऐकवण्यात आले.
प्रत्येक प्रयोगापूर्वी आणि प्रयोगानंतर साधकांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंतया लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
२. दत्ताचा तारक नामजप ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे
दत्ताचा तारक नामजप ऐकण्यापूर्वी दोघांमध्ये नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा होती. त्यांनी दत्ताचा तारक नामजप ऐकल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.
३. दत्ताचा मारक नामजप ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे
दत्ताचा मारक नामजप ऐकण्यापूर्वी दोघांमध्ये नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा होती. त्यांनी दत्ताचा मारक नामजप ऐकल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.
१. दोन्ही साधकांना लहान, मध्यम आणि मोठ्या आवाजातील नामजपांतून उत्तरोत्तर अधिक लाभ झाला.
२. दोन्ही साधकांना लहान आणि मध्यम आवाजातील मारक नामजपाच्या तुलनेत लहान अन् मध्यम आवाजातील तारक नामजपातून अधिक लाभ झाला.
३. साधिकेला मोठ्या आवाजातील तारक नामजपाने सर्वाधिक लाभ झाला, तर साधकाला मोठ्या आवाजातील मारक नामजपाने सर्वाधिक लाभ झाला.
४. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
४ अ. देवतेच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपांचे महत्त्व : देवतेची तारक आणि मारक अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप, उदा. आशीर्वाद देतांनाच्या मुद्रेतील श्रीकृष्ण. देवतेचे असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे मारक रूप, उदा. शिशुपालावर सुदर्शनचक्र सोडणारा श्रीकृष्ण. देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. देवतेप्रती सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी, तसेच चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती लवकर येण्यासाठी अन् वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी देवतेच्या तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो. देवतेकडून शक्ती अन् चैतन्य ग्रहण होण्यासाठी आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी देवतेच्या मारक रूपाचा नामजप आवश्यक असतोे.
४ आ. दत्ताच्या तारक आणि मारक नामजपातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे चाचणीतील दोन्ही साधकांना आध्यात्मिक लाभ होणे : चाचणीतील दोन्ही साधकांना वाईट शक्तींचा आणि पूर्वजांचाही त्रास आहे. प्रयोगांच्या आरंभी दोन्ही साधकांमध्ये नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा होत्या. दत्ताच्या तारक आणि मारक नामजपातून प्रक्षेपित झालेले चैतन्य साधकांनी त्यांच्या क्षमतेनुसार ग्रहण केल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
४ इ. दत्ताच्या मारक नामजपाच्या तुलनेत तारक नामजपाचा दोन्ही साधकांवर अधिक सकारात्मक परिणाम होणे : व्यक्तीने स्वतःच्या प्रकृतीनुसार देवतेचा तारक किंवा मारक नामजप केल्यास तिला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होतो. ‘तारक’ किंवा ‘मारक’ प्रकृती असलेल्या साधकांमध्ये त्यांच्या प्रकृतीला अनुरूप लक्षणे आढळतात. उदा. तारक प्रकृतीच्या साधकामध्ये भावपूर्ण आणि हळू आवाजात नामजप करणे, दिलेली सेवा एकमार्गी भावपूर्ण करत रहाणे इत्यादी, तर मारक प्रकृतीच्या साधकामध्ये आवेशाने नामजप करणे, समष्टीत (सर्वांसमोर) आवेशाने बोलणे किंवा मार्गदर्शन करणे इत्यादी लक्षणे आढळतात.
देवतेच्या मारक नामजपातून देवतेच्या शक्तीची स्पंदने मिळतात. व्यक्तीला असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ तिने मारक नामजप मोठ्याने करणे लाभदायी असते. मोठ्याने नामजप केल्याने देवतेच्या शक्तीची स्पंदने व्यक्तीला मिळाल्याने तिच्यातील नकारात्मक स्पंदने अल्पावधीत न्यून किंवा नष्ट होतात, तसेच तिच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ होते. याचाच प्रत्यय चाचणीतील साधकांना ऐकवण्यात आलेल्या दत्ताच्या नामजपाच्या प्रयोगांच्या वेळी आला.
४ ई. साधिकेला मोठ्या आवाजातील तारक नामजप ऐकल्याचा सर्वाधिक लाभ होणे, तर साधकाला मोठ्या आवाजातील मारक नामजप ऐकल्याचा सर्वाधिक लाभ होणे : लहान आवाजातील नामजप सत्त्वप्रधान, मध्यम आवाजातील नामजप सत्त्व-रजप्रधान, तर मोठ्या आवाजातील नामजप रज-सत्त्वप्रधान आहे. चाचणीतील दोन्ही साधकांना त्यांची प्रकृती आणि त्यांची आवश्यकता यांनुसार तारक किंवा मारक प्रकारातील त्या त्या आवाजातील नामजपातून लाभ झाला.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.९.२०२०)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
|