अनधिकृत होर्डिंगमुळे तुर्भे परिसराला बकाल स्वरूप !
नवी मुंबई, २ डिसेंबर (वार्ता.) – विविध राजकीय पक्ष आणि संस्था यांच्या अनधिकृत होर्डिंगमुळे (फलकांमुळे) तुर्भे-वाशी परिसराला बकालपणा आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा परवाना विभाग, तसेच विभाग कार्यालय यांच्याकडून कोणतीही अनुमती न घेता हे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. यामुळे महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. राजकीय दबावामुळे होर्डिंगवर अनेक दिवस कारवाई केली जात नाही.
या होर्डिंगमुळे काही वेळा वाहतूक कोंडीही होते; मात्र वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. या अनधिकृत होर्डिंगमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियाना’लाही बाधा होत आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे लोगो आणि बॅनर यांच्यावरही काहींनी त्यांचे होर्डिंग लावलेले आहेत. (असे करणार्या संबंधितांवर गुन्हे नोंद करण्याचे अधिकार असतांनाही महापालिका प्रशासनाकडून ते का केले जात नाही ? आयुक्त आणि अधिकारी यांनी यात लक्ष घालून या प्रकरणी कारवाई करावी ! – संपादक)