मानवाच्या जीवनाचे सोने करणारी भगवद्गीता !
आज, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी ‘गीता जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
‘आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. हा दिवस आपण ‘गीता जयंती’ म्हणून साजरा करतो. जगातील हा एकमेव असा ग्रंथ आहे की, ज्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते. यामागचे कारण असे की, भगवद्गीता हा जीवनग्रंथ आहे. या भूतलावर जोपर्यंत मानवी समाज असेल, तोपर्यंत त्या मानवी समाजाला मार्गदर्शन करू शकेल, असा जगातील एकमेव ग्रंथ म्हणजे ‘गीता’ ग्रंथ ! |
१. विश्वातील सर्वोत्तम ग्रंथ ‘गीता’ !
जीवनाचा विकास साधण्यासाठी गीतेतील विचार प्रेरणा देतात, मार्गदर्शन करतात, मानवाला जीवनाभिमुख करतात. म्हणूनच विश्वातील ‘सर्वोत्तम ग्रंथ’ म्हणून ‘गीता’ ग्रंथ मान्यता पावला आहे. गगनाला उपमा द्यायची झाली, तर गगनाची; सागराला सागराचीच उपमा द्यावी लागेल. त्याप्रमाणे गीता ग्रंथाला उपमा द्यायची असेल, तर गीता ग्रंथाचीच द्यावी लागेल.
२. भगवान श्रीकृष्णाचे मानवावरचे असलेले उत्कट प्रेम गीतेतून व्यक्त झाले आहे. गीता वाचतांना ‘भगवंत मानवाला पडणार्या प्रश्नांची उत्तरे आपल्याजवळ बसून आपल्या पाठीवरून हात फिरवत देत आहे’, असे आपल्याला वाटते.
३. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम झालेली व्यक्ती म्हणजे संत !
मानवाच्या जीवनात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम होणे आवश्यक आहे. केवळ ज्ञान असेल, तर जीवन रुक्ष होते. केवळ भक्ती असेल, तर माणूस दुबळा होतो. केवळ कर्म असेल, तर मानवाचे जीवन शुष्क होते. ज्यांच्या जीवनात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम झाला आहे, त्यांना ‘संत’ म्हणतात. म्हणून संतांचे अंत:करण भावभक्तीने भरलेले असते. त्यांचा भगवंतावर शतप्रतिशत विश्वास असतो. संत कोणतीही अपेक्षा ठेवून कर्म करत नाहीत. म्हणून त्यांचे जीवन शुद्ध आणि पवित्र असते. संतांना काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या ६ शत्रूंवर विजय संपादन करता आला; कारण गीतेतील शिकवण त्यांनी आचरणात आणून आपल्या जीवनात उतरवली. सारे संत ज्ञानी असून ते भक्त असतात. म्हणून त्यांना ‘ज्ञानी भक्त’ म्हणतात.
४. गीतेचे सामर्थ्य
भगवान श्रीकृष्ण उत्कृष्ट मुरली वादक ! त्याने गीतारूपी अनोखी मुरली रणांगणावर वाजवली. अनेक गोष्टींशी झुंज देतांना माणसाने स्वतःचे जीवन सुखी करायचे आहे. ‘प्रतिकूल परिस्थितीत लढता लढता तेजस्वी जीवन जगता येते’, असा सिद्धांत गीतेने मांडला आहे. ‘गीता माणसाचे जीवन तो जिवंत असतांनाच पूर्णपणे पालटते’, हेच गीतेचे सामर्थ्य आहे.
५. गीतेचे अलौकिकत्व
प्रथम क्षात्रधर्माच्या दृष्टीने युद्ध करणे योग्य आहे, असे अर्जुनाला वाटत होते. त्याने समोर गुरुजनांना पाहिले आणि त्याच्या मनात विचार आला, ‘यांच्याशी युद्ध केल्यावर आपल्याला पाप लागेल.’ त्यामुळे त्याच्यावर पूर्वी जे संस्कार झाले होते, त्याने पूर्वी जे ज्ञान प्राप्त केले होते, ते त्याच्या विस्मृतीत गेले आणि तो मोह, मायेत अडकला. त्यामुळे गलितगात्र झालेला अर्जुन ‘मी युद्ध करणार नाही’, असे म्हणत होता. भगवंताने उपदेश केल्यावर अर्जुनाला पूर्वीचे संस्कार आणि शिकवण आठवली. म्हणून तो भगवंताला सांगतो, ‘‘भगवंता, तू जसे सांगशील तसे मी करीन.’’
अशा प्रकारे गीता माणसाला अंतर्बाह्य पालटते. माणसाचे जीवन अंतर्बाह्य पालटणार्या गीतेचा जन्म रणांगणात झाला. हेच गीतेचे अलौकिकत्व आहे. म्हणूनच या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते.
६. ‘गीता जयंती’ साजरी करण्यामागील कार्यकारणभाव
जोपर्यंत बुद्धी, मन, अंतःकरण आणि वर्तन यांत शुद्धता अन् पवित्रता येत नाही, तोपर्यंत भगवंताच्या अंतर्गृहात जाण्याची जीवाला अनुमती नाही. असे कठोरपणे मानवाला सांगण्याचे धाडस असणारा एकमेव ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. मानवाच्या जीवनाचे सोने व्हावे, यासाठी गीतेने अशी कठोरता धारण केली आहे. गीतेची कठोरताच मानवासाठी लाभदायक आहे. गीतेची शिकवण मानवाच्या विस्मृतीत जाऊ नये, यासाठी ‘गीता जयंती’ साजरी करण्याची प्रथा पडली आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (१.१२.२०२२)