स्वतःच्या लागवडीतील भाजीपाल्याच्या बियांची साठवण कशी करावी ?

आपण घरी भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या यांची लागवड करत असतो. ही लागवड करत असतांना बिया महत्त्वाच्या असतात. या बियांची साठवणूक कशी करावी ? सर्वसाधारण आणि काही विशिष्ट भाज्यांच्या बिया साठवण्याची योग्य पद्धत काय ? याविषयीची काही महत्त्वपूर्ण सूत्रे या लेखात देत आहोत.

(पूर्वार्ध)

१. विश्वसनीय बियाणे मिळण्यासाठी स्वतःच त्याची साठवण करणे आवश्यक  

‘आपण आपल्या बागेत भाज्यांचे पीक घेतो. (‘भाज्या लावतो’, यापेक्षा ‘पीक घेतो’ असे म्हटल्यावर नैतिक उत्तरदायित्व वाढते आणि कामात अधिक गांभीर्यही येते.) त्या पिकांचे आयुष्य ३ – ४ मासांचे असते. वांगी, मिरची इत्यादी काही पिके सोडल्यास इतर फळभाज्या आणि पालेभाज्या यांची पुढील लागवड करण्यासाठी बियांची आवश्यकता असते. (वांगी, मिरची इत्यादी पिकांच्याही बियांची आवश्यकता असते. केवळ प्रत्येक ऋतूनंतर (‘सीझन’नंतर) भरीव छाटणी केल्यास नवीन फुटींवरही पुढच्या ऋतूला भाज्या मिळतात. केवळ पहिल्या खेपेपेक्षा संख्या आणि क्वचित् आकार अल्प पडतो. असे साधारण ३ – ४ ऋतू चालते.) रोपवाटिका किंवा बियाणांच्या दुकानातून मिळणार्‍या बिया या जर ‘हायब्रिड’ असतील, तर प्रत्येक वेळच्या लागवडीसाठी आपल्याला बिया विकत आणाव्या लागतात; पण जर आपण देशी बियाणे वापरत असू, तर पुढील लागवडीसाठी लागणार्‍या बिया आपल्या आपणच सिद्ध करून त्या साठवू शकतो. असे केल्याने वेळ आणि पैसा, तर वाचतोच; पण आपल्याला विश्वसनीय (खात्रीशीर) बियाणे उपलब्ध होते.

श्री. राजन लोहगांवकर

२. श्रम आणि पैसा वाचवण्यासाठी स्थानिक पिकाची लागवड करणे लाभदायक  

साधारणतः आपापल्या विभागातील माती, वातावरण, पर्जन्यमान यांचा विचार केवळ भाज्याच नव्हे, तर कुठलेही पीक घेत असतांना केला जात असतो. हे अगदी पूर्वापार चालत आलेले आहे आणि त्यामागे अभ्यास आणि अनुभव आहे. निसर्गतः कुठलीही बी तिला आवश्यक तो ओलावा, तापमान आणि ऊर्जा मिळाल्यावर रुजते; परंतु तिची पुढील वाढ, त्या बीपासून आलेले झाड फुलणे आणि फळणे यांसाठी माती, वातावरण, सूर्यप्रकाश आणि त्यांमधली तीव्रता या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात अन् त्या आपण पुरवू शकत नाही. अन्यथा बर्फाळ प्रदेशातही नारळाची झाडे दिसू शकली असती. श्रम आणि पैसा वाचवण्यासाठी स्थानिक वाणाची (जातीची) आणि पीक प्रकाराची निवड केली जाते.

३. स्वतः साठवलेल्या बियांपासून निर्माण होणार्‍या पुढच्या पिढ्या स्थानिक वातावरणातील पालटांना तोंड देण्यास सक्षम होत जाणे  

आपण जेव्हा पहिल्यांदाच कुठल्या बिया वापरणार असू, तर त्यासाठी देशी किंवा पारंपरिक (हेअरलूम) प्रकारातील बिया निवडल्या आणि त्या प्रत्येक ऋतूनंतर आपण साठवत जाऊन पुढील लागवडीसाठी वापरल्या, तर आपल्या येथील वातावरणास तोंड देण्यास अशा बिया प्रत्येक पिढीनंतर अधिक सक्षम होत जातात. बियांच्या साठवणीमागे हेही सूत्र महत्त्वाचे असते.

४. योग्य पद्धत जाणून घेतल्यास बिया साठवणे सोपे असणे

साठवणीसाठी आणि पुढील लागवडीसाठी बिया धरण्यासाठी योग्य रोपाची निवड, रोपावरील फळ काढण्याचा योग्य कालावधी आणि बियांवर प्रक्रिया करून त्यांची योग्य पद्धतीने साठवण या प्रमुख गोष्टींकडे लक्ष द्यायची आवश्यकता असते. हे सारे अतिशय सोपे काम आहे. केवळ त्याची योग्य ती पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे.

५. बियांच्या साठवणीविषयी महत्त्वाची सूत्रे

अ. आपण जर ‘हायब्रिड’ बिया लावल्या असतील, तर अशा झाडांपासून मिळणार्‍या बिया या पुनर्लागवडीसाठी उपयोगी पडत नाहीत.

आ. ज्या रोपांमधे किंवा भाज्यांच्या प्रकारांमधे ‘स्वपरागीकरण (सेल्फ पोलिनेशन)’ आणि ‘मुक्त परागीकरण (ओपन पोलिनेशन)’ होत असते, अशीच रोपे बियांच्या साठवणीकरता निवडावीत.

इ. बागेत जर ‘हायब्रिड’ आणि देशी किंवा मुक्त परागीकरण (ओपन पोलिनेशन) होणार्‍या या दोन्ही प्रकारांतील बिया पेरल्या असतील, तर बियांच्या पुढील साठवणुकीसाठी देशी प्रकारातील सुदृढ आणि निरोगी झाडांची निवड करून ती वेगळी ठेवावीत. वार्‍यामुळे किंवा एकमेकांजवळ ठेवल्यामुळे ‘परपरागीकरण (क्रॉस पोलिनेशन)’ होण्याची शक्यता असते आणि येणारी पुढील पिढी कशी येईल, हे सांगता येत नसते; म्हणून ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

ई. बियांच्या साठवणुकीसाठी निवडलेल्या रोपांवर काही फळे (शक्यतो प्रथम आलेल्या फळांपैकी काही फळे) ही तशीच रोपांवर ठेवून ती पूर्ण पिकू द्यावीत. पिकत असतांना त्यांच्यात होत असलेल्या पालटांवर लक्ष ठेवावे. फळे किंवा शेंगा पूर्ण सिद्ध होत असतांना त्यांचा आकार एका मर्यादेपर्यंत वाढून त्यानंतर वाढ थांबते आणि रंग पालटू लागतो. काही फळांच्या संदर्भात त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. असे पालट नजरेस पडताच ती गळून खाली पडायच्या आधीच काढून घेऊन सावलीत ठेवावीत.

६. काही विशिष्ट भाज्यांचे बियाणे साठवण्याच्या पद्धती

सर्वसाधारणपणे सर्वच प्रकारच्या बियांच्या साठवणुकीची पद्धत एकच असली, तरी काही फळांच्या संदर्भात विशेष काळजी घ्यावी लागते.

६ अ. टोमॅटो : जर तुम्ही एकापेक्षा अधिक प्रकारचे देशी टोमॅटोंचे पीक घेत असाल, तर अशी रोपे वेगवेगळी ठेवून त्याची व्यवस्थित नोंद करावी. शक्य असेल, तर प्रत्येक प्रकारातील २ – ३ रोपे वेगळी ठेवल्यास उत्तम होईल. प्रत्येक प्रकारातील ३ – ४ टोमॅटो झाडांवर पूर्ण पिकू द्यावेत. पूर्ण पिकलेले टोमॅटो अर्धे कापून त्यांतील गर स्वच्छ धुतलेल्या चमच्याने एखाद्या भांड्यात काढून घ्यावा. भांडे पारदर्शक असल्यास उत्तम. हे करण्यापूर्वी हात आणि भांडे दोन्हीही स्वच्छ धुतलेले असावे. काढलेला गर तसाच ३ – ४ दिवस सावलीत ठेवावा. भांड्यावर झाकण ठेवावे. याला मुंग्या लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी. टोमॅटोच्या बियांवर एक पातळसा पापुद्रा असतो. तो आपल्याला काढायचा आहे; पण तो बिया धुऊन हाताने काढतांना बियांना हानी पोचण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला भरपूर काळजी घेण्याची आवश्यकता असते.

या ३ – ४ दिवसांत गर प्रतिदिन एकदाच स्वच्छ चमच्याने हालवत रहावा. या वेळी वरच्या बाजूला पांढरट थर जमा होईल. तो साचू देऊ नये. यासाठी चमच्याने ढवळणे आवश्यक असते. असा पांढरा थर जर अधिक असेल आणि तो वेगळा करता येत असेल, तर तो चमच्यानेच काढून टाकावा. ३ – ४ दिवसांनी भांड्यात बिया खाली बसलेल्या दिसतील. मग चमच्याने हलकेच वरचा गर काढून टाकावा. आता भांड्यात केवळ बिया राहिल्या असतील. त्यांवर पाणी घालून ठेवावे. काही बिया वर तरंगताना दिसल्या, तर त्या काढून टाकाव्यात. नंतर २ – ३ वेळा बिया पाण्याने व्यवस्थित धुऊन घेऊन त्या कागदावर किंवा एखाद्या ताटलीमध्ये वाळत ठेवाव्यात. बिया पूर्ण कोरड्या झाल्यावर त्या झिप लॉकच्या पिशवीमध्ये, कागदाच्या पाकिटात किंवा एखाद्या हवाबंद डबीमध्ये ठेवून वर पट्टी (लेबल) लावून त्यावर ‘बी’चा प्रकार, साठवण्याचा दिनांक हे सगळे लिहावे, म्हणजे पुढच्या ऋतूमध्ये हे सारे उपयोगी पडेल. डबी किंवा पिशवी जे काही बिया ठेवण्यासाठी वापरले असेल, ते साधारण तापमानात आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे.

६ आ. वांगी : वांग्यांचे जेवढे प्रकार लावले आहेत, त्यांपैकी प्रत्येकी न्यूनतम एक तरी रोप वेगळे काढून इतर रोपांपासून दूर ठेवावे. त्यावरील वांगी पूर्ण सिद्ध होऊ द्यावीत. वांगी आधी पिवळी होऊन मग तपकिरी रंगाची होतील. त्वचेचा तुकतुकीतपणा जाईल. कडकपणा जाऊन मऊ पडतील. पूर्ण पिकल्यावर वांगी एक तर झाडावरून गळून पडतील किंवा हात लावताच सहजासहजी हातात येतील. अशी वांगी काढून ४ – ५ दिवस घरातच उघड्यावर ठेवून द्यावीत. नंतर सुरीने हलकेच कापून घ्यावीत. आतला गर कोरडा पडला असेल. त्यातच तपकिरी रंगाच्या बिया दिसतील. टोकदार सुरीने बियांना न दुखवता त्या वेगळ्या कराव्यात. एखाद्या भांड्यात घेऊन त्या २ – ३ वेळा धुऊन घेऊन सगळा गर गेला असल्याची निश्चिती करावी. नंतर गाळून घेऊन एखाद्या कागदावर किंवा ताटलीमध्ये पसरून ठेवाव्यात. वाळल्यावर कागदी पाकिटात ठेवून देऊन वर प्रकार आणि दिनांक इत्यादी विवरण लिहून ठेवावे.’

(उत्तरार्ध पुढील शुक्रवारी)

– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा, जिल्हा ठाणे (साभार : https://vaanaspatya.blogspot.com)