राजस्थानच्या वाळवंटातील ‘ऑस्ट्रा हिंद २२’ युद्धाभ्यास !
‘कोणत्याही देशाचे संरक्षण आणि मोठेपण हे त्या देशाच्या सैनिकी सामर्थ्यावर अवलंबून असते. त्यासाठीच जगातील बहुसंख्य देश त्यांचे सैनिकीकरण आणि बळकटीकरण यांवर भर देत आहेत. यात भारतही मागे नाही. भारत सरकारकडून देशाला बळकट करण्यासाठी वारंवार प्रयत्न होत आहेत. यात मित्रराष्ट्रांसमवेत युद्धसराव हा एक महत्त्वाचा भाग समजला जातो. राजस्थानमध्ये ‘महाजन फिल्ड फायरिंग रेंज’मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लष्करी युद्ध सरावाला २८ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. ‘ऑस्ट्रा हिंद २२’ असे नाव असलेल्या या युद्ध सरावाचा अभ्यास ११ डिसेंबरपर्यंत चालू राहील. या युद्ध सरावाच्या मालिकेत टप्प्याटप्प्याने दोन्ही देशांच्या लष्कराच्या सर्व प्रकारच्या तुकड्या सहभागी होणार आहेत. एकूणच ‘ऑस्ट्रा हिंद’ युद्ध सरावाचे स्वरूप कसे असेल, त्याचा उद्देश आणि दोन्ही देशांसाठी असलेले त्याचे महत्त्व अशा विविध सूत्रांविषयी आकाशवाणी मुंबईच्या ‘वृत्तविशेष’ कार्यक्रमात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले विवेचन जाणून घेऊया.
१. ‘ऑस्ट्रा हिंद २२’ युद्धाभ्यासाचे स्वरूप
२८ नोव्हेंबरपासून ११ डिसेंबरपर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे सैन्य एक युद्धाभ्यास राजस्थानमध्ये ‘महाजन फिल्ड फायरिंग’मध्ये करत आहे. त्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्या एका ‘सेकंड डिव्हिजन’ची १३ वी ब्रिगेड (एका ब्रिगेडमध्ये २ सहस्र ५०० ते ३ सहस्र सैनिक असतात. त्यात पायदळ, थोडे रणगाडे, ‘आर्मर पर्सनल कॅरिअर’ (सैनिक नेणार्या चिलखती गाड्या), तोफा वगैरे) सहभागी होत आहे. या अभ्यासामध्ये अशा प्रकारची सर्व शस्त्रे आणि सर्व्हिसेस भाग घेणार आहेत. यात भारताकडून एक ब्रिगेड सहभागी होत आहे. त्यात ‘डोग्रा रेजिमेंट’चे सैनिक आणि अन्य शस्त्रे असतील.
२. युद्धाभ्यास ‘महाजन फिल्ड फायरिंग’मध्ये होण्यामागील कारण
‘महाजन फिल्ड फायरिंग’ ही अशी जागा आहे, जेथे वाळवंट आणि थोडी झाडी असल्याचा भाग आहे. फिल्ड फायरिंग ही अशी जागा असते, तेथे युद्धाभ्यास करण्याविना तोफा, रायफल, लाईट मशीनगन या सर्वांचा प्रत्यक्ष मारा करता येऊ शकतो. या भागात लोक रहात नसल्याने तेथे वास्तविक युद्धाभ्यास करता येतो.
३. युद्धाभ्यासाचा उद्देश
‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो’, असे भारताचे युद्धशास्त्रावरील तज्ञ आर्य चाणक्य यांनी सहस्रो वर्षांपूर्वी म्हटले होते. भारताचा शत्रू चीन आहे आणि चीनचे शत्रू ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, दक्षिण आशियातील सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया आदी देश आहेत. चीनच्या या सर्व शत्रूंशी आपले मित्रत्व वाढणे आवश्यक आहे. आवश्यकता पडली, तर चीन विरोधातील आपल्या मित्रराष्ट्रांची एक फळी निर्माण करून चीन विरुद्धची लढाई ही अधिक चांगल्या पद्धतीने लढता येईल. त्यासाठी ऑस्ट्रेलियासमवेतचा हा युद्धाभ्यास चालू आहे.
अ. एकत्र अभ्यास केला, तर एकमेकांकडून पुष्कळ शिकता येते.
आ. दोन्ही सैन्याने एकत्र काम करायचे ठरवले, तर ते सोपे जाते.
इ. युद्धातील विविध पैलू, तसेच रणगाडे, तोफखाना, ‘आर्मर पर्सनल कॅरिअर’ यांचा ‘सपोर्ट’ (साहाय्य) आदी सर्वांचा अभ्यास केला जाऊ शकतो.
ई. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियातही वाळवंटाचा मोठा भाग आहे. वाळवंटात लढाई कशी करायची, याचा भारतीय सैन्याला प्रचंड अनुभव आहे. त्या अनुभवाचा लाभ भारत ऑस्ट्रेलियाला देणार आहे. विविध नवीन तंत्रज्ञानांचाही अभ्यास केला जातो. प्रत्येक राष्ट्राच्या युद्धकला वापरण्याच्या पद्धतींमध्ये भेद असतो. युद्धाभ्यासामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची युद्धक्षमता वाढण्यास साहाय्य होईल.
उ. अनेकदा संयुक्त राष्ट्रे स्वतःचे सैन्य शांतता टिकवून ठेवण्याच्या मोहिमेवर वाळवंटी भागात पाठवत असते. या अभ्यासामुळे अशा सैन्याला लाभ होतो.
४. युद्धाभ्यासाचा लाभ आणि भारताचे जगातील वाढते महत्त्व
भारत केवळ ऑस्ट्रेलियाशीच नाही, तर अशा प्रकारचा अभ्यास अजून २० ते २५ देशांशी विविध क्षेत्रांमध्ये करत आहे. यात ऑस्ट्रेलियासह अमेरिका, जपान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स आदी देशांचा समावेश आहे. भारत या युद्धाभ्यासाच्या माध्यमातून त्यांच्याशी असलेले संरक्षण संबंध अधिक सबळ करत आहे. त्यामुळे भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा यशस्वीपणे प्रतिकार करता येईल. अशा प्रकारचा युद्धाभ्यास यापूर्वी होत नव्हता. चीनचा धोका निर्माण झाल्यामुळे भारत चीनविरुद्ध विविध युद्धांची सिद्धता करत आहे.
युद्धाभ्यासाचे ‘बायलॅटरल’ (द्विपक्षीय) आणि ‘मल्टीलॅटरल’ (बहुपक्षीय – अनेक) असे दोन प्रकार असतात. ‘बायलॅटरल’मध्ये एका बाजूला भारत आणि दुसर्या बाजूला अन्य मित्र राष्ट्रे असतात. ‘मल्टीलॅटरल’ युद्धाभ्यासामध्ये अन्य देश सहभागी होतात. जसे चतुर्भुज सहकार्यातील अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत एकत्रितपणे यांच्या नौदलाचा संयुक्त अभ्यास करत आहेत. पुढे समुद्रातील लढाई एकत्रितपणे केली जाईल. त्यासाठी भारताला अन्य राष्ट्रांचे साहाय्य घ्यावे लागेल. भविष्यातील धोके लक्षात घेऊन भारताला मित्रराष्ट्रांचे साहाय्य घेण्याची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी जागतिक स्तरावर विविध बैठका घेण्यात येत आहेत. देशाला सुरक्षित ठेवण्याचे कार्य मित्रराष्ट्रांच्या साहाय्याने अधिक चांगले करता येते.
५. मित्रराष्ट्रांच्या साहाय्याने युद्धाभ्यास केल्यास भारताची विविध क्षेत्रांमध्ये स्वसंरक्षणाची क्षमता वाढणे
भारताचे हवाई दल अमेरिका आणि जपान यांच्या हवाई दलाशी युद्धाभ्यास करते. नौदलाच्या युद्धाभ्यासात सागरी सुरक्षा करण्याविषयीचा अभ्यास केला जातो. खोल समुद्रात, उदा. हिंदी महासागर, इंडो-पॅसेफिक महासागर, बंगालची खाडी, अरेबियन समुद्र आदी ठिकाणी चिनी जहाजांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी चतुर्भुज सहकार्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जाता. खोल समुद्रावरील अभ्यासासाठी मोठी जहाजे लागतात. ती अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्याकडे आहेत. दक्षिण आशियातील देशांच्या समुद्रामध्ये चिनी जहाजांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू असते. तेथेही भारताने युद्धाभ्यासाला प्रारंभ केला आहे.
आता आकाश आणि अवकाश यांचेही सैनिकीकरण होत आहे. तेथून आक्रमण झाले, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, याचा युद्धाभ्यास चालू आहे. देशाला असणार्या धोक्याचे अवलोकन करून त्याचा मित्रराष्ट्रांच्या साहाय्याने युद्धाभ्यास केला, तर विविध क्षेत्रांमध्ये स्वरक्षणाची क्षमता वाढते. त्यामुळे देशाला अधिक सुरक्षित करता येते. हाच या विविध प्रकारच्या युद्धाभ्यासाचा सर्वांत मोठा हेतू आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.