विश्वविघातक प्रदूषण रोखा !
‘पर्यावरणीय पालट’, ‘पर्यावरण प्रदूषण’, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ हे शब्द आज जगात सर्वत्र प्रचलित आहेत. प्रत्येकालाच त्याचे दुष्परिणाम ठाऊक आहेत. अनेक जण किंवा अनेक संघटना हे दुष्परिणाम रोखण्यासाठी अविरत प्रयत्नरत आहेत. याच अनुषंगाने पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असणारी ‘द टायर एक्स्टिंग्विशर्स’ ही सामाजिक संस्था जगभरात प्रसिद्ध आहे. तिच्या पदाधिकार्यांनी ८ देशांमध्ये पर्यावरण रक्षणाची एक वैशिष्ट्यपूर्ण मोहीम आरंभली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी थोड्याथोडक्या नव्हे, तर ९०० गाड्यांचे टायर पंक्चर केले. ज्या गाड्या अधिक प्रदूषण करणार्या होत्या, त्यांच्या संदर्भात ही कृती करण्यात आली. खरे पहाता कुणालाही चकित करणारी ही घटना आहे; कारण ‘पर्यावरणरक्षण आणि टायर पंक्चर करणे यांचा संबंध काय ?’, असा प्रश्न पडू शकतो. प्रदूषणाचे वाढते प्रमाण पहाता सर्वांमध्येच मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्यक आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले जावे आणि एकाच वेळी सर्वांपर्यंत त्याचे गांभीर्य पोचावे, या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलून अनोख्या पद्धतीने ही मोहीम राबवली. अमेरिका, नेदरलँड्स, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, स्वीडन, स्वित्झर्लंड अशा मोठ्या देशांत अशा स्वरूपाचा निषेध रात्रीच्या वेळेत करण्यात आला. जर्मनीतील ब्रँडनबर्ग विमानतळावर काही पर्यावरणप्रेमी धावपट्टीवरच बसले. त्यांनी विमानासाठी असलेल्या ‘ट्रॅक’वर सायकली चालवल्या आणि तिथेच ठिय्या आंदोलन केले. ‘विमाने प्रदूषणाला कारणीभूत असल्याने त्यांचाही वापर बंद व्हावा’, अशी त्या सर्वांची मागणी होती. कुणाला या कार्यकर्त्यांची कृती चुकीची आणि निंदनीय वाटू शकते. ‘पर्यावरण’ या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात टायर पंक्चर करण्याची काय आवश्यकता होती ?’, असेही वाटेल; पण यामागील त्यांचा उद्देश लक्षात घ्यायला हवा. कृती जरी विक्षिप्त असली, तरी त्यातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व जनमानसावर बिंबून ते विचार अधिक सक्रीय आणि तीव्र होतील, हे निश्चित ! या पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे की, दिवसेंदिवस चारचाकी गाड्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे कार्बनचे वाढते उत्सर्जन हे हवामानासाठी धोकादायक ठरत आहे. गाडी खरेदी करणार्या प्रत्येकानेच याचा अवश्य विचार करावा. सद्य:स्थितीत घरातील ४ माणसांसाठी प्रत्येकी १ गाडी असतेच. प्रदूषणाचा विचार करता खरोखरच प्रत्येकाला गाडीची इतकी आवश्यकता आहे का ? चौघांमध्ये एक गाडी पुरेशी ठरणार नाही का ? ‘पर्यावरणाचा र्हास होऊ न देता माझ्या गरजा मी भागवीन’, असा विचार का केला जात नाही ? ‘आपण आपत्ती व्हायचे कि आपत्तीतून मार्ग काढायचा ?’, याचा विचार करणे, ही काळाची आवश्यकता आहे.
प्रदूषणाला कारणीभूत मानव !
वर्ष २०२२ मध्ये इंग्लंड आणि संपूर्ण युरोप येथील तीव्र उष्णतेचा तेथील लोकांना त्रास झाला. मुसळधार पावसामुळे पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झाली. अमेरिकेत उन्हामुळे जंगलांना आग लागली. भारतातही उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, दुष्काळ अशा सर्वच कारणांमुळे पिकांची हानी झाली. हा पर्यावरणीय प्रदूषणाचाच परिणाम आहे. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे शहरीकरण, औद्योगीकरण, जंगलांमधील वृक्षतोड यांमुळे पर्यावरणीय समतोल बिघडून गेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे त्यांच्या क्षेत्रात कितीही गरुडभरारी घेत असले, तरी पर्यावरणीय प्रदूषणाचे गणित मात्र त्यांना अद्याप सोडवता आलेले नाही, हेही तितकेच खरे आहे. ‘त्यांनी केलेली तथाकथित प्रगती मनुष्याच्या अस्तित्वावर घाला घालणारी आहे’, हेच वारंवार यातून लक्षात येते. आण्विक शस्त्रांचा वाढता वापर आणि लादलेली युद्धे प्रदूषणात भर घालत आहेत. अशा सर्वच प्रकारच्या प्रदूषणाला जगातील मानव प्रतिदिन जन्म देत आहे आणि वाढवत आहेत. निसर्गावर स्वामित्व गाजवण्याच्या मानवाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी तो निसर्गाला ओरबाडत चालला आहे. यामुळे आज वसुंधरा धोक्यात आहे. प्रदूषणाचा भस्मासुर सजिवांचे अस्तित्व संपवू शकतो; पण ही दुर्दैवी वेळ आपल्याला आणायची नाही. ‘जगातील सर्वच सरकारे यात अपयशी ठरत आहेत’, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यामुळे प्रत्येकानेच पर्यावरण रक्षणासाठी आत्मनिर्भर होणे, ही काळाची आवश्यकता आहे. पर्यावरणाच्या मोठ्या संकटाचा सामना सर्वांनीच निकराने करायला हवा. प्रत्येकात पर्यावरण रक्षणाची जाणीव आणि आस्था निर्माण व्हायला हवी. ‘प्रदूषणातून पर्यावरणाकडे’, असा प्रत्येक देशाचा प्रवास होणे अपरिहार्य आहे. यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगण्यासह कठोर कायद्यांची कार्यवाहीही करायला हवी. नैसर्गिक साधनसंपत्तीची कास धरून तिला प्रवाहात आणायला हवे.
प्रदूषण नियंत्रणाचा मूळ स्रोत हिंदु धर्मातच !
प्रदूषणाचे जगभरातील परिणाम भीषण आहेत. भारतही त्याची झळ सोसत आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे वायूप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ५० सहस्र गर्भपात होतात. मेरठच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रदूषणामुळे ७ शिक्षकांनी स्थानांतराची मागणी केली आहे. जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे आपल्या भारतातच आहेत. या घटना भारतासाठी लाजिरवाण्या आहेत. कोणे एकेकाळी सर्वच दृष्ट्या आदर्श समजला जाणारा भारत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ‘प्रदूषित भारत’ म्हणून ओळखला जाणे, हे आपल्यासाठी दुर्दैवी आहे. याचा भारतियांनी विचार करायला हवा. ‘द टायर एक्स्टिंग्विशर्स’ या संस्थेने जो प्रकार अन्य देशांत केला, तो भारतात होऊ नये, याची दक्षता केंद्र सरकारने घ्यावी. प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराचा सामना करण्याचे मोठे शस्त्र हिंदु धर्मातील ऋषिमुनींनी ‘अग्निहोत्रा’च्या माध्यमातून आपल्याला आधीच उपलब्ध करून दिले आहे. अग्निहोत्रातून उत्पन्न झालेल्या धुराने वायूचे शुद्धीकरण होऊन हानीकारक विषाणूंचा नाश होतो. त्याचा अवलंब वैश्विक स्तरावर होण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रयत्न करावेत. हिंदु धर्म हा पर्यावरणप्रिय आहे. त्यानुसार आचरण केल्यास प्रदूषणाची तीव्रता निश्चितच न्यून होऊ शकते.