कराड येथे ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा !
कराड, २ डिसेंबर (वार्ता.) – मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी म्हणजेच शिवप्रतापदिनानिमित्त ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन करून ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र यांसहित शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अफझलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज कराड येथे आले असता त्यांनी युद्धात वापरलेली शस्त्रे येथील कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमावर धुऊन या ठिकाणी असणार्या श्री भवानीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. याच मंदिरात सायंकाळी सामूहिक आरती करण्यात आली. या वेळी मनोगत व्यक्त करतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाहक श्री. सागर आमले यांनी सकल हिंदु समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम लक्षात घेण्याची आवश्यकता असून देव, देश आणि धर्म यांवर आलेले संकट दूर होण्यासाठी, तसेच श्री शिवछत्रपतींना अपेक्षित असे कार्य आपणा सर्वांच्या हातून घडण्यासाठी बळ मिळावे, याकरिता श्री भवानीमातेच्या चरणी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ आणि धारकरी उपस्थित होते.