वर्धा येथे परिचारिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आधुनिक वैद्यावर गुन्हा नोंद !
वर्धा – शहरातील एका चिकित्सालयातील परिचारिकेस मिठी मारून तिचे चुंबन घेतल्याप्रकरणी आधुनिक वैद्य यशवंत हिवंत याच्या विरोधात १ डिसेंबर या दिवशी विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिकित्सालयात एकटी असल्याची संधी साधून आधुनिक वैद्य हिवंज याने परिचारिकेस स्वतःच्या दालनात बोलावून घेतले. ‘एका रुग्णामुळे आज आपल्याला ५ सहस्र रुपयांचा लाभ झाला. तुझ्यामुळेच लाभ झाला आहे’, असे म्हणत तिचा विनयभंग केला. त्यामुळे धक्का बसलेल्या परिचारिकेने आरडाओरड केली. हा प्रकार तिने आपल्या सहकार्यांना बाहेर येत रडत रडत सांगितला. (तरुणींनो, असे रडण्यापेक्षा स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन विनयभंग करणार्यांना वेळीच धडा शिकवा ! – संपादक) त्यांनी तिला घरी जाण्यास सांगितले. घरच्यांनी हा प्रकार ऐकताच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
संपादकीय भूमिकासमाजातील नैतिकता किती खालावली आहे, याचे हे उदाहारण ! आधुनिक वैद्याकडून असा किळसवाणा प्रकार होणे, हे निंदनीय आणि लज्जास्पद आहे. आधुनिक वैद्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे ! |