अंधारात भ्रमणभाष (मोबाईल) पाहिल्याचे गंभीर परिणाम जाणून शारीरिक हानी टाळा !
‘सध्या भ्रमणभाषच्या (मोबाईलच्या) वापराचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. रात्रंदिवस भ्रमणभाषचा अतिरेकी वापर केला जातो. अनेकजण रात्रीच्या अंधारातही बराच वेळ भ्रमणभाष पहातात. भ्रमणभाषचा अंधारात वापर केल्याने गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
१. अंधारात, तसेच भ्रमणभाषचा अतीवापर केल्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो. भ्रमणभाषच्या पडद्याकडे (स्क्रिनकडे) सतत पाहिल्याने आपल्या डोळ्यांची उघडझाप अल्प प्रमाणात होते. त्यामुळे डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होतात. आपल्या डोळ्यांत कचरा किंवा अन्य काही वस्तू गेल्यास अश्रू येऊन डोळे स्वच्छ होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया असते; पण भ्रमणभाषच्या वापरामुळे डोळ्यांत आवश्यक तेवढे अश्रू निर्माण होत नाहीत. परिणामी, डोळे निरोगी रहाण्याची नैसर्गिक प्रक्रिया न्यून होत जाते, दृष्टी अंधुक होते आणि दृष्टीदोष निर्माण होतात.
२. रात्री उशिरापर्यंत भ्रमणभाष पाहिल्याने निद्रानाशाचा विकार जडू शकतो. काही वेळा शांत झोप न लागणे, मधे-मधे जाग येणे, जाग येताच भ्रमणभाष पहाण्याची तीव्र इच्छा होऊन अधिक वेळापर्यंत तो पहाण्याची कृती होणे, पुरेशी झोप न झाल्यामुळे मन एकाग्र न होणे, अस्वस्थ वाटत रहाणे, यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
३. अंधारात भ्रमणभाष वापरल्यामुळे त्यातून बाहेर पडणार्या रेडिएशनचा डोळ्यांवर आणि मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे शरिरातील मेलाटोनिन या हार्माेनचा स्तर न्यून होऊ लागतो. त्यामुळे मेंदूत गाठी (ब्रेन ट्यूमर) निर्माण होण्याची शक्यता वाढते.
४. भ्रमणभाषमुळे हाताच्या मांसपेशींवर ताण येतो. परिणामी, मेंदूमध्ये नकारात्मकता निर्माण होण्याचा धोका वाढतो.
काही वेळा अंधारात भ्रमणभाष पहाणे अपरिहार्य असते. अशा वेळी पुढीलप्रमाणे काळजी घेता येईल.
१. अंधारात भ्रमणभाषच्या स्क्रिनचा ब्राइटनेस (brightness) अत्यंत अल्प ठेवावा.
२. अंधारात, तसेच दिवसाही भ्रमणभाषकडे एकटक न पहाता डोळ्यांची अधिक प्रमाणात उघडझाप करावी.
३. अंधारात भ्रमणभाष आपल्या शेजारी न ठेवता शरिरापासून किमान ३ फूट दूर ठेवावा, जेणेकरून त्याच्या किरणांचा थेट परिणाम शरिरावर होणार नाही.
देवाने आपल्याला दिलेल्या शरिराची काळजी घेणे, ही आपली साधना आहे, या भावाने शरिराची हानी होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष द्या.’
– डॉ. पांडुरंग मराठे, फोंडा, गोवा. (२६.११.२०२२)