‘आई’ बनून सुनेची प्रेमाने काळजी घेणार्या आणि दोन्ही मुले अन् सुना यांना पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणार्या सौ. विजया साळोखे !
‘आई’ बनून सुनेची प्रेमाने काळजी घेणार्या आणि आर्थिक स्थिती बिकट असूनही दोन्ही मुले अन् सुना यांना पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणार्या वरसई, पेण (जिल्हा रायगड) येथील सौ. विजया साळोखे (वय ६८ वर्षे) !
‘१५.१.२०१५ या दिवशी माझा विवाह वरसई, पेण (जिल्हा रायगड) येथील श्री. रवींद्र साळोखे यांच्याशी झाला. त्यापूर्वी साधारण एक वर्षापासून सौ. विजया पांडुरंग साळोखे (वय ६८ वर्षे) (माझ्या होणार्या सासूबाई) यांच्याशी माझी भेट आणि संपर्क होत होता. विवाहानंतर साधारण एक वर्ष मी त्यांच्यासोबत सासरी रहात होते. या ८ वर्षांत मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. घर-संसार चालवण्यासाठी सासूबाईंनी नोकरी करणे
घरची (सासरची) आर्थिक स्थिती बेताची असल्याने ती.सौ. आई (सासूबाई) नोकरी करून घर चालवत असत. वयाच्या १६ व्या वर्षापासून ६५ वर्षापर्यंत त्यांनी नोकरी केली. त्यांना रविवारीही सुटी मिळत नसे. इतकी वर्षे त्यांनी सातत्याने काम केले आहे.
२. मुले आणि सुना यांच्याकडून अपेक्षा नसणे
२ अ. ‘मुलांनी पैसे कमवून घर चालवायला हातभार लावावा’, अशी अपेक्षा न करता आईंनी दोन्ही मुलांना पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणे : माझे यजमान श्री. रवींद्र यांनी शिक्षण घेत असतांनाच पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी माझे मोठे दीर श्री. नितीन साळोखे यांनीही पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. घरची आर्थिक स्थिती बेताची असतांना ‘दोन्ही मुलांनी नोकरी करून पैसे कमवावेत’, अशी अपेक्षा न करता आईंनी (सासूबाईंनी) दोन्ही मुलांना पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती दिली.
२ आ. दोन्ही सुनांनाही आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणे : मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई, सौ. जया नितीन साळोखे (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आम्ही दोघीही देवद येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. आईंनी दोन्ही मुलांनाच नव्हे, तर आम्हा सुनांनाही आश्रमात राहून साधना करण्याची अनुमती दिली. ‘सुनांनी घरी राहून साहाय्य करावे’, अशी अपेक्षा त्यांनी केली नाही. ‘हा त्यांचा मोठा त्याग आहे’, असे मला वाटते.
३. घरात केलेले पालट सहजतेने स्वीकारणे
आमच्या विवाहानंतर ‘घर आश्रमाप्रमाणे व्हावे’, यासाठी मी आणि रवींद्र यांनी घरात काही पालट सुचवले, तर आई ते पालट सहजपणे स्वीकारत. खरे पहाता अनेक वर्षांच्या स्वतःच्या संसारात कुणी काही पालट सुचवले, तर स्त्रियांना ते स्वीकारणे कठीण जाते; पण आईंनी पुष्कळ सहजतेने हे पालट स्वीकारले आहेत.
४. सासू-सुनेमध्ये निर्माण झालेले आई-मुलीचे सुंदर नाते !
४ अ. ‘लग्नाआधी सून खोकल्याने पुष्कळ आजारी आहे’, हे लक्षात आल्यावर सासूबाईंनी ‘आई’ बनून पू. वैद्य विनय भावेकाका यांचे आयुर्वेदाचे उपचार चालू करणे : मला आई-वडील नाहीत. त्यामुळे आमच्या लग्नाच्या आधीपासूनच सासूबाई माझी ‘आई’ बनून काळजी घेत आहेत. लग्नाआधी मी खोकल्याने पुष्कळ आजारी असायचे. औषधे घेऊनही माझा खोकला न्यून होत नव्हता. तेव्हा आईंनी मला सासरी बोलावले आणि सनातनचे संत पू. वैद्य विनय भावेकाका यांच्याकडून माझे उपचार चालू केले. (२५.६.२०२१ या दिवशी पू. भावेकाका यांनी देहत्याग केला.) त्या भ्रमणभाष करून ‘मी औषधे घेते कि नाही’, याचा पाठपुरावा घ्यायच्या. पू. (कै.) वैद्य भावेकाकांच्या आयुर्वेदाच्या औषधांमुळे काही दिवसांतच माझा खोकला पूर्ण बरा झाला.
४ आ. परिस्थिती आणि अडचण समजून घेणे : आध्यात्मिक त्रासामुळे माझी प्राणशक्ती अल्प असते. त्यामुळे मला सकाळी लवकर उठण्यात अडचण येते. आईंनी ही परिस्थिती सहजपणे स्वीकारली आहे.
४ इ. नात्यात सहजता आणि प्रेम निर्माण झाल्याने सासू-सुनेला एकमेकींच्या चुका सहजपणे सांगता येणे अन् कोणतीही गोष्ट त्यांनी एकमेकींना विचारून करणे : आईंनी ‘सासू’ म्हणून कधीही माझ्यावर अधिकार गाजवला नाही. त्या माझ्यापेक्षा मोठ्या असूनही मला काही विचारतांना त्यांना कमीपणा वाटत नाही. आई आणि मी एकमेकींच्या चुका सहजपणे सांगतो अन् कोणतीही गोष्ट एकमेकींना विचारूनच करतो. आमच्या नात्यात कोणतेही दडपण किंवा ताण नसून सहजता आहे. आम्हा दोघींमध्ये सासू-सुनेचे नाते नसून आई-मुलीचे नाते निर्माण झाले आहे. त्या माझी सगळी काळजी घेतात.
५. नामजप करणे
पूर्वी आई मोकळेपणाने बोलत नसत आणि मायेतील विषयांमध्ये रमण्याचा त्यांचा भाग अधिक असायचा. आता आई बसून नियमित नामजप करतात.
६. परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणे
आईंची प.पू. गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉक्टरांवर) दृढ श्रद्धा आहे. ‘माझी मुले आणि सुना गुरुदेवांच्या (सनातनच्या) आश्रमात आहेत, तर त्यांचे चांगलेच होईल’, अशी त्यांची श्रद्धा आहे. ‘मुले आणि सुना यांची साधना चांगली होऊन सर्वांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी आई प.पू. गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतात.
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला आईसारखे प्रेम देणार्या सासूबाई मिळाल्या. ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती लवकर होऊ दे आणि त्यांचे गुण माझ्यात येऊ देत’, अशी प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. राधा रवींद्र साळोखे (सौ. विजया साळोखे यांची धाकटी सून), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.१०.२०२२)