नवी मुंबईत पुढील २० वर्षे करवाढ करणार नाही ! – गणेश नाईक, आमदार, भाजप
नवी मुंबई – महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळू न देता पुढील २० वर्षे नवी मुंबईकरांना करवाढ करणार नाही, असे आश्वासन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी येथे दिले. साठेनगर (दिघा) येथे महापालिकेच्या माता-बाल रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, स्थानिक माजीनगरसेवक सभापती नवीन गवते आदी मान्यवर उपस्थित होते.
नाईक पुढे म्हणाले की, दिघा येथील विकासकामांसाठी ५० लाख रुपयांचा स्थानिक आमदार विकास निधी देणार आहोत. सलग २५ वर्षे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवी मुंबईच्या जनतेने नवी मुंबई पालिकेत आपल्याला एकहाती सत्ता दिली. हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. भविष्यातही नवी मुंबईकरांवर करवाढीचा बोजा पडू देणार नाही, असे नाईक यांनी सांगितले.
मोरबे धरणामुळे नवी मुंबई जलसंपन्न झाली आहे. शहराची वाढती लोकसंख्या पहाता टाटा हायड्रो पॉवरचे अतिरिक्त पाणी नवी मुंबईकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दिघा येथे जनतेच्या मागणीनुसार सी.बी.एस्.सी. बोर्डाची शाळा महापालिकेच्या माध्यमातून चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणामध्ये दिघा येथील ज्या नागरिकांची घरे आणि दुकाने गेली आहेत, त्यांचे पुनर्वसन लवकर करण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्यासह चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन गवते यांनी गणेश नाईक आणि संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा विभागात दीडशे कोटींपेक्षा अधिक निधीची विकासकामे चालू असल्याचे सांगितले. रुग्णालय, पटनी रस्ता, जलकुंभ, यूटीडब्ल्यू रस्ते इत्यादी विकासकामांचा उल्लेख त्यांनी या वेळी केला.