संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात वाद
|
नाशिक – संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात झालेल्या राजकीय युतीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी असलेले मतभेद समोर आले आहेत. शहरात आयोजित संभाजी ब्रिगेडच्या सहाव्या वर्धापनदिन सोहळ्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी व्यासपिठावरून वादग्रस्त विधान केल्यामुळे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी त्यावर आक्षेप घेतला.
१. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बरबने यांच्यासह काही पदाधिकार्यांनी व्यासपिठावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मत व्यक्त केले.
२. त्याविषयी भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महापुरुष यांच्याविषयी आपल्यासारख्यांना बोलण्याचा अधिकार नाही’, असे सुनावले, तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या कारागृहाची आपण स्वतः पाहणी केली आहे’, असे सांगितले.
३. पत्रकारांशी बोलतांना भास्कर जाधव म्हणाले, ‘‘संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात मुख्य प्रवक्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अतिशय चुकीचे वक्तव्य केले. व्यासपिठावर माझ्यासारखा माणूस असतांना ते वक्तव्य कदापि सहन करणार नाही. शिवसेनेची भूमिका ही सावरकरांच्या बाजूने आहे; पण सावरकरांचा उपयोग काही पक्ष हा केवळ मते आणि राजकारण यांसाठी करत आहेत. सावरकर हा शिवसेनेसाठी श्रद्धेचा विषय आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये २५-२५ वर्षांची २ वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे, हे विसरून चालणार नाही. सावरकरांविषयी सर्वांनीच आदर बाळगला पाहिजे. त्यांच्याविषयी कुणीही चुकीचे वक्तव्य करू नये आणि केले, तरी ते आम्ही सहन करणार नाही आणि ते आम्हाला मान्य होणार नाही. माझी भूमिका ही शिवसेनेची आणि समस्त देशवासीय यांची असली पाहिजे, असा माझा आग्रह आहे.’’