शहापूर तालुक्यात काही गावांत भूकंपाचे हादरे
गावकर्यांमध्ये भीती
ठाणे, १ डिसेंबर (वार्ता.) – मागील ६ ते ७ दिवसांपासून शहापूर तालुक्यातील सोगाव, वेहळोली, कानडी, कानवे, चेरवली आणि किन्हवली या गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसल्याचे जाणवत आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे शहापूर तालुक्यातील सोगाव येथील काळू नदीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याची नोंद भाग्यनगर येथील एन्.जी.आर्.आय. या संस्थेने भातसा धरणात बसवलेल्या अक्सेलोग्राफ या यंत्रात नमूद झाली आहे.
यापूर्वीही असेच भूकंपाचे हादरे बसले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या हादर्यांमुळे काही ग्रामस्थांच्या घराला तडे गेले आहेत. यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाच्या हादर्यांमुळे ग्रामस्थांच्या झालेल्या हानीचे पंचनामे स्थानिक तलाठ्यांकडून केले जात असल्याची माहिती तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांनी दिली आहे.