५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. गार्गी पद्माकर पवार (वय ६ वर्षे) !
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. गार्गी पवार उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची ५५ टक्के पातळीची आहे’ , असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५६ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१५.१०.२०२२)
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. आठवले |
१ अ. आज्ञापालन करणे : ‘एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘कोणत्या वेळी अंघोळ केली, तर ती कुणाची वेळ असते आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो ?’, असे प्रसिद्ध झाले होते. मी ती सूत्रे वाचून गार्गीला सांगितले, ‘‘उशिरा अंघोळ केली, तर ती राक्षसांची वेळ असते.’’ तेव्हा दुसर्या दिवसापासून ती ‘‘मला लवकर अंघोळ घाल. मला देवांच्या वेळेतच अंघोळ करायची आहे’’, असे सांगू लागली.
१ आ. भजनांची आवड : गार्गी एकपाठी असल्याने ती जे ऐकेल, ते तिला लगेच मुखोद्गत होते. तिची बहुतांश भजने मुखोद्गत आहेत. ती भजने गुणगुणत असते.
१ इ. सात्त्विकतेची आवड
१. ती लहानपणापासून सनातनचा साबण, दंतमंजन, शिकेकाई, तेल वापरते. तिच्या बाबांनी तिला कधी अंघोळीसाठी अन्य साबण दिला, तर ती ‘सनातनचा हवा आहे’, असे सांगते. ती ‘‘सर्वच वस्तू सनातनच्या का नाहीत ग, आई’’, असे म्हणते.
२. तिला लहानपणापासून सनातनच्या ७० व्या संत पू. उमा रवीचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांविषयीचे ग्रंथ (‘बालकभावातील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह) आणि ‘बालकभावातील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)) आवडतात. ती प्रत्येक चित्रात ‘काय सांगितले आहे ?’, याविषयी विचारते.
१ ई. मंदिरांविषयी अभिमान : दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या मंदिरांच्या चित्रांविषयी गार्गी जाणून घेते. ‘मंदिर सरकारीकरण’ विषयीच्या वृत्तांमध्ये असलेल्या चित्रांकडे पाहून ती ‘आपल्या मंदिराला असे का करतात ?’, असे विचारते. तिला त्याचे वाईट वाटते. ती खेळतांना तिच्या मित्र-मैत्रीणींना त्याविषयी सांगतांना ‘‘आपल्याला मंदिर वाचवायचे आहे’’, असे म्हणते.
१ उ. चुकांविषयी संवेदनशील : गार्गीकडून चूक झाल्यास ती क्षमा मागते आणि प्रायश्चित्त म्हणून उठाबशा काढते. तिला कधी चूक मान्य नसतांना तिला प्रेमाने सांगितल्यास ती चूक मान्य करते. ती क्षमायाचना करून ‘‘किती उठाबशा काढू ?’’, असे मला विचारते.
१ ऊ. सेवा करायला आवडणे : एकदा मी गार्गीला ‘‘तुला पनवेल, येतगाव आणि सातारा रोड, यांपैकी कोणते ठिकाण अधिक आवडते ?’’, असे विचारल्यावर ती लगेच ‘पनवेल’, असे म्हणाली. मी तिला ‘‘पनवेलच का ?’’ असे विचारल्यावर ती मला म्हणाली, ‘‘तिथे सेवा करायला मिळते.’’ गार्गी मनापासून तिला जमेल, तशी सेवा करत होती. तिला सेवा करायला मिळाल्यामुळे ती पुष्कळ आनंदी होती.
१ ए. देवतांप्रती भाव
१ ए १. तिला घरातील कुणी रागावल्यास ती श्रीकृष्णाच्या चित्रापुढे उभी रहाते आणि त्याला सर्व सांगते.
१ ए २. श्रीकृष्ण, श्रीराम आणि दत्तगुरु यांचा रंग आकाशी असल्याने गार्गीला हाच रंग आवडणे : गार्गी ३ वर्षांची झाल्यानंतर ती ‘‘मला आकाशी रंगाच्या वस्तू, कपडे, खेळणी हवीत आणि मला हाच रंग आवडतो’’, असे सांगत असे. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तुला हाच रंग का आवडतो ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘दत्तबाप्पा, श्रीकृष्णबाप्पा आणि श्रीरामबाप्पा यांचा हा रंग आहे; म्हणून मला हा रंग आवडतो.’’
१ ए ३. प्रार्थना करू लागल्यावर अनुसंधानात वृद्धी होणे : मी तिला प्रार्थना करायला सांगितली होती, ‘हे श्रीकृष्णा,
प.पू. गुरुमाऊली, माझ्या मन आणि बुद्धी यांवरचे काळे (त्रासदायक) आवरण दूर होऊ दे. मला नामजप करण्याची बुद्धी द्या. मला तुमच्याशी सतत अनुसंधान साधता येऊ दे. तुमची माझ्यावर अखंड कृपादृष्टी असू दे’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’ गार्गी प्रतिदिन ही प्रार्थना करते. गुरुदेवांच्या कृपेने या प्रार्थनेमुळे तिच्यात पालट जाणवत आहे. ‘तिचे अनुसंधान वाढले आहे’, असे जाणवते.
२. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटण्याची आणि बघण्याची ओढ असणे
गार्गी काही प्रसंगांत ‘‘बाप्पा आजोबांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांना भेटायला जाऊयात ना गं’’, असे म्हणत असते. तिला गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) ‘ऑनलाईन’ जन्मोत्सव सोहळा आणि गुरुपौर्णिमा सोहळा दाखवला होता. तेव्हा ती ‘‘आपण आश्रमात कधी जाणार ? बाप्पाआजोबा कधी भेटणार ?’’, असे म्हणू लागली.
३. घरात दैवी कण आढळणे
गार्गीचा जन्म झाल्यापासून आमच्या घरात नेहमीच दैवी कण आढळतात. गार्गी रुग्णाईत असतांना किंवा तिला त्रास होत असतांना तिचे शरीर आणि कपडे यांवर, तसेच ती झोपते, तिथे पुष्कळ दैवी कण आढळतात.
४. स्वभावदोष : हट्टीपणा, स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे, आवड-नावड असणे, चंचलपणा आणि तुलना करणे.’
५. नामजप करण्याची आवड
‘गार्गीला आणि तिच्या भावांना ‘‘नामजपादी उपाय करा’’, असे सांगितल्यावर ती त्या दोघांना घेऊन नामजप करते. तिला देवघरासमोर बसून नामजप करायला आवडते.’ – सौ. पुष्पलता उथळे (कु. गार्गीची आजी), येतगाव, विटा, सांगली. (लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२२.०१.२०२२)