भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत आणि त्यामागील कारणे
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘काही विशिष्ट शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य पद्धतीने कसे लिहावेत आणि ते तसे का लिहावेत ?’, याविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही शब्द पाहू.
(लेखांक १६ – भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/630579.html
(टीप : या विषयातील ‘२ अ’ ते ‘२ इ’ ही सूत्रे शुक्रवार, १८.११.२०२२ या आणि ‘२ ई’ ते ‘२ औ’ ही सूत्रे शुक्रवार, २५.११.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत.)
भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत आणि त्यामागील कारणे
२ अं. सप्तलोकांची नावे आणि त्यांचे व्याकरण : सप्तलोकांची नावे ही संस्कृत व्याकरणानुसार लिहिली जातात. पुढील सारणीत ही नावे आणि त्यांतील ‘लोक’ हा शब्द काढून त्या नावांत असलेले मूळ शब्द दिले आहेत.
२ अं १. सप्तलोकांच्या नावांमधील व्याकरण
२ अं १ अ. ‘रेफांत’ शब्द आणि त्यांचा नियम : सूत्र क्र. ‘२ अं’मधील सारणीत दिल्याप्रमाणे २, ३ आणि ४ क्रमांकाच्या ‘लोकां’च्या नावांतील मूळ शब्द ‘भुवर्’, ‘स्वर्’ अन् ‘महर्’ हे आहेत. या सर्व शब्दांच्या शेवटी ‘र्’ हे अक्षर आले आहे. अशा शब्दांना ‘रेफांत’ शब्द असे म्हणतात. संस्कृत व्याकरणानुसार या शब्दांचा ‘रेफ (र्)’ काढून त्यांची ‘भुव’, ‘स्व’ आणि ‘मह’ अशी रूपे लिहिणे अयोग्य आहे. ती ‘भुवर्’, ‘स्वर्’ आणि ‘महर्’ अशीच लिहायला हवीत. या रूपांना ‘लोक’ हा शब्द जोडतांना त्यांतील ‘र्’ हे अक्षर ‘लोक’ या शब्दातील ‘लो’ या अक्षरात सामावले जाते आणि ‘र्लाेक’ हे रूप सिद्ध होते. यानुसार ‘भुवर्लाेक’, ‘स्वर्लाेक’ आणि ‘महर्लाेक’ याप्रमाणे नावे लिहिणे योग्य आहे.
२ अं १ आ. ‘भूर्लाेक’ला पर्यायी ‘भूलोक’ आणि ‘स्वर्लाेक’ला पर्यायी ‘स्वर्गलोक’ हे शब्दही वापरू शकत असणे : सारणीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेला ‘भूर्’ हादेखील ‘रेफांत’ शब्दच आहे; परंतु त्याला ‘भू’ हा ‘रेफांत’ नसलेला पर्यायी शब्द संस्कृतमध्येच देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तिसर्या क्रमांकावर असलेल्या ‘स्वर्’ या ‘रेफांत’ शब्दाला ‘स्वर्ग’ हा पर्यायी शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे या शब्दांना ‘लोक’ हा शब्द जोडल्यावर ‘भूर्लाेक’सह ‘भूलोक’ आणि ‘स्वर्लाेक’सह ‘स्वर्गलोक’ हे शब्दही आपण वापरू शकतो.
२ अं १ इ. ‘तपस्’ या मूळ शब्दापासून ‘तपोलोक’ हा शब्द सिद्ध होण्याची प्रक्रिया : सूत्र क्र. ‘२ अं’ मधील सारणीतील ‘तपस्’ या शब्दाच्या अंती ‘स्’ आला आहे. या शब्दाला ‘सकारांत’ शब्द असे म्हणतात. हा शब्द भाषेत वापरला जातांना त्यातील ‘स्’ या अक्षराचे विसर्गात (ः त) रूपांतर होते आणि तो ‘तपः’ असा लिहिला जातो. ‘तपः’ या शब्दाला ‘लोक’ हा शब्द जोडल्यास ‘तपः + लोक = तपोलोक’ असा संधी सिद्ध होतो. याचा नियम असा आहे की, ‘पहिल्या शब्दातील विसर्गाच्या (ः च्या) आधी ‘अ’युक्त अक्षर असेल, जसे ‘तपः’मध्ये ‘प’ आहे आणि दुसर्या शब्दातील पहिले अक्षर ‘ल’सारखे मृदू व्यंजन असेल, तर विसर्गाचे (ः चे) रूपांतर ‘उ’ या स्वरामध्ये होते. ‘प’मधील ‘अ’ आणि विसर्गाचा ‘उ’ एकत्र येऊन ‘ओ’ हा स्वर सिद्ध होतो. त्यामुळे ‘प’चा ‘पो’ होतो. अशा प्रकारे ‘तपोलोक’ हा शब्द सिद्ध होतो. आपण यापूर्वी पाहिलेच आहे की, मराठी वर्णमालेत व्यंजनांच्या ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ आणि ‘प्’ या पाच गटांपैकी प्रत्येक गटातील शेवटची तीन व्यंजने, म्हणजे ‘ग्, घ्, ङ्’; ‘ज्, झ्, ञ्’; ‘ड्, ढ्, ण्’; ‘द्, ध्, न्’ आणि ‘ब्, भ्, म्’ अन् अन्य व्यंजनांपैकी ‘य्, र्, ल्, व्, ह्, ळ्’ ही व्यंजने मृदू व्यंजने आहेत.
(क्रमशः पुढील शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.११.२०२२)