मानवाला वासनामुक्त बनण्यासाठी धर्माची आंतरिक प्रेरणाच महत्त्वाची !
आज, २ डिसेंबर २०२२ या दिवशी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
‘धर्म आणि संस्कृती यांची प्रेरणाच मानवाला (पुरुष अन् स्त्री यांना) वासनामुक्त बनवू शकते. धर्म आणि संस्कृती नसांनसांतून वहाणारे तत्त्वज्ञानच मानवातील ‘पुरुषार्थ’ जागवू शकतो ! त्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे –
१.पद्मिनी आणि सहस्त्रशः क्षत्राणी चित्तोड दुर्गावर लवलवणार्या ज्वालांनी भडकलेल्या आगीत स्वतःला झोकून देतात.
२. नववधू हाडाराणीच्या लग्नाला जेमतेम एक मास झालेला असतो. समरभूमीवर जाणार्या तिच्या नवर्याचे मन तिच्याभोवती घुटमळते. तो माघारी येतो. त्याला ती याच आंतरिक प्रेरणेने स्वतःचे मस्तक छाटून भेट देते. आता तो निःशंक प्राणाची बाजी लावून लढेल; म्हणून ती हे सगळे करते.
३. एक राजस्थानी रमणी समरभूमीवरून पळ काढणार्या आपल्या पतीला घराबाहेर उभा करून त्याला साडी, चोळी आणि बांगड्या यांचा अहेर देते.
४. दुसरी रमणी तर अशा भ्याड नवर्याला घरातच घेत नाही. दाराआडून ती सांगते, ‘भ्याडाला माझे दर्शन व्हायचे नाही. या जन्मात नव्हे, तर पुढच्या जन्मातही, नव्हे अनंत जन्मांत ! या जीवनात पराक्रमाची शर्थ करा, म्हणजे पुढच्या जन्मी आपली भेट होईल.’ धर्माच्या आंतरिक प्रेरणेने वासनामुक्त झालेली स्त्रीच असे ‘पौरुष’ व्यक्त करू शकते. ही धर्माची आंतरिक प्रेरणा परमात्मा समाधी प्राप्त करून देते. वासनेची (संभोगाची) तर बातच नको.’
– गुुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, नगर
(साभार : साप्ताहिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०१२)