दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचनेनुसार ‘आंबा’ आणि ‘पैसे’ असा नामजप केल्यावर झालेले त्रास अन् ‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर झालेला लाभ !
‘१६.५.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचनेनुसार मी ‘आंबा’ आणि ‘पैसे’ असा जप प्रत्येकी १० मिनिटे केला. त्या वेळी मला झालेले त्रास आणि ‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर झालेला लाभ, यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. आंब्याचे रूप डोळ्यांसमोर आणून ‘आंबा’ या शब्दाचा जप करतांना मनात अनावश्यक विचार येऊन अस्वस्थता येणे
‘आंबा’ या शब्दाचा जप करतांना ‘प्रथम ‘आंबा’ या फळाचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले आणि त्याची चवही आठवली. मला हापूस आणि पायरी आंबे यांचीही चव आठवली. नंतर आंब्यापासून बनवले जाणारे अनेक पदार्थ मला आठवले, उदा, आमरस, आम्रखंड, आंबावडी. नंतर या पदार्थांशी निगडित विचारांची शृंखला माझ्या मनात चालू झाली आणि हे पदार्थ खाण्याचे विचार मनात येऊ लागले. मनात अनावश्यक विचार वाढल्याने काही प्रमाणात मला अस्वस्थता आली. तेव्हा ‘रजोगुण वाढत आहे’, असे मला वाटले. मला या विचारांतून बाहेर पडायला पुष्कळ वेळ लागला.
२. पैशांचे रूप डोळ्यांसमोर आणून ‘पैसा’ या शब्दाचा जप करतांना ‘स्वतःभोवती अनिष्ट शक्तीचे आवरण वाढून श्वास कोंडला जात आहे’, असे जाणवणे
‘पैसा’ या शब्दाचा जप करतांना मला डोळ्यांसमोर काळ्या रंगाचा पडदा दिसला. या ‘जपातून पुष्कळ तमोगुण निर्माण होऊन माझ्याभोवती अनिष्ट शक्तीचे आवरण वाढत आहे’, असे मला जाणवले. ‘भूमी, गाड्या, दागिने, भ्रष्टाचार, मारामारी, युद्ध आणि सत्ता’, यांविषयी दृश्ये दिसून माझ्या छातीत धडधड होऊ लागली. त्या वेळी माझा श्वास कोंडला जात होता आणि ‘मी कधी एकदा हा जप बंद करते’, असे मला वाटत होते.
३. ‘निर्विचार’ हा नामजप करणे
त्यानंतर मी ‘निर्विचार’ हा नामजपही १० मिनिटे केला. त्यानंतर मला झालेले त्रास न्यून होऊन वरील स्थितीतून लवकर बाहेर पडता आले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला हा प्रयोग करता आला. ‘एखादा शब्द पुनःपुन्हा उच्चारल्यावर त्याचा मनावर कसा परिणाम होतो’, हे यातून शिकता आले. हे सर्व शिकवल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. ज्योती दाते (आताची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |