प्रार्थना आणि श्रद्धेचे बळ !
गुजरातमधील कच्छमध्ये रहाणारे श्री. महादेव देसाई यांच्या गोशाळेतील २५ गायींना लंपी विषाणूची लागण झाली होती. लंपी विषाणूमुळे त्या भागांतील गायी मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत होत्या. लंपी रोगापासून गायींचा बचाव होण्यासाठी श्री. महादेव देसाई यांनी द्वारकाधीश श्रीकृष्णाला नवस केला. ‘जर माझ्या गायी वाचल्या, तर मी तुझ्या दर्शनाला माझ्या २५ गायींसह चालत येईन.’ जेव्हा सगळ्याच गायी वाचल्या, तेव्हा ते द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी (अंतर ४५० कि.मी.) आपल्या गायींसमवेत आले.
त्यांच्यासाठी मंदिराची कवाडे मध्यरात्री उघडण्यात आली. मंदिराच्या प्रशासनाने गायींसाठी चारा आणि पाणी यांची व्यवस्था केली. ही घटना अतिशय दुर्मिळ आणि इतिहासात पहिल्यांदाच झाली असेल, असे म्हणावे लागेल. ही घटना म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी आणि नास्तिक यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
(सौजन्य : TV9 Bharatvarsh)
इथे भक्ताच्या आर्त हाकेला प्रतिसाद देऊन भगवंत भक्तासाठी धावून आला, तसेच भक्तानेही भगवंताला दिलेला शब्द पाळला, अशी अद्वितीय घटना आहे. ही आहे प्रार्थना आणि श्रद्धेची शक्ती ! हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. कोरोनाच्या काळात मनुष्य हतबल झाला होता. कित्येकांनी प्राण गमावले. पैसा किंवा संपत्ती उपयोगी पडली नाही. विज्ञानानेही हात टेकल्यावर समाजाला ईश्वरी शक्तीची जाणीव झाली. त्या कालावधीत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांकडून ‘प्रार्थना केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते का ?’, याविषयी संशोधन चालू करण्यात आले होते. आधुनिक वैद्यही रुग्णांवर उपचार करतांना हतबल होतात, तेव्हा ते रुग्णांच्या नातेवाइकांना प्रार्थना करण्यास सांगतात. ‘इस्रो’मधील वैज्ञानिकही प्रत्येक उपग्रह अवकाशात सोडण्यापूर्वी त्याची प्रतिकृती तिरुपति बालाजीच्या मंदिरात अर्पण करतात आणि पूजा, प्रार्थना करतात. असे असले, तरी सद्यःस्थितीत अहंकाराने मनुष्याची नीतीमत्ता खालावत चालली आहे. त्यामुळे तो सात्त्विकता, धर्माचरण यांपासून दूर जात आहे.
वरील उदाहरणातून बोध घेऊन मनुष्याने साधना, भक्ती वाढवली, तरच येणार्या घोर आपत्काळात त्याचा टिकाव लागेल. घोर आपत्काळात अन्य कुणीही नाही, तर भगवंतच आपले रक्षण करू शकतो. देव भावाचा भुकेला आहे. मनापासून केलेली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोचतेच. भक्ताने भगवंताला आर्ततेने हाक मारल्यावर भगवंत भक्तासाठी धावून येतोच याची भक्त प्रल्हाद, संत जनाबाई यांसारखी असंख्य उदाहरणे आहेत. यांचा आदर्श समोर ठेवून येणार्या काळासाठी श्रद्धा आणि भक्तीच वाढवूया !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे