नागपूर येथील एस्.टी.तील पात्रता परीक्षेत अपव्यवहार प्रकरणी ३ अधिकारी निलंबित !
नागपूर – कोरोनाच्या काळात रखडलेल्या एस्.टी. चालक आणि वाहक यांच्या अंतिम पात्रता परीक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ प्रसारित झाला होता. एस्.टी. महामंडळाच्या मुख्यालयाने याची गंभीर नोंद घेऊन ३ अधिकार्यांना निलंबित केले आहे. ज्योती उके (यंत्र अभियंता चालक, वर्धा), चंद्रकांत वडस्कर (विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा) आणि प्रमोद वाघमारे (साहाय्यक वाहतूक निरीक्षक, नागपूर) अशी त्यांची नावे आहेत.
चालक-वाहक पदांच्या चालन परीक्षेत तिघांची समिती होती. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशाने ही कारवाई झाली. प्रसारित झालेला व्हिडिओ हा जिल्ह्यातील धापेवाडा येथील आहे. त्यात पात्रता परीक्षेसाठी आलेले उमेदवार दिसत आहेत. परीक्षेत पात्र ठरण्यासाठी उमेदवाराकडून २ सहस्र १०० रुपये द्यावे लागत असल्याचे संभाषण आहे.
संपादकीय भूमिकाअपव्यवहार करणार्या दोषी अधिकार्यांना नुसते निलंबित केल्यास त्यांच्या वृत्तीत काहीच पालट होणार नाही ! त्यामुळे अशा अधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई करून कायमचे घरी पाठवले पाहिजे. |