बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) येथील रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी २ अधिकारी निलंबित !
नागपूर – २८ नोव्हेंबर या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी (वय ४८ वर्षे) यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात १३ प्रवासी घायाळ झाले होते. या अपघाताला उत्तरदायी धरून रेल्वे प्रशासनाने रेल्वे विभागातील इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी.जी. राजूरकर आणि याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव यांना २९ नोव्हेंबर या दिवशी निलंबित केले आहे. चंद्रपूर येथील खासदार बाळू धानोरकर यांनी तशी मागणी केली होती. बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.