तुर्भे येथील उद्यानाची दुरवस्था; रहिवाशांना उद्यानात जाण्यास बंदी
नवी मुंबई – तुर्भे सेक्टर २१ येथील ‘ज्ञानेश्वर वाळुंज उद्यान’ या उद्यानाची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. येथील जनतेच्या पैशातून बनवलेल्या या उद्यानाला टाळे लाण्यात आले आहे. तसेच येथे जाण्यास बंदी करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत आहे. या उद्यानाच्या दोन्ही बाजूंच्या दरवाजांना २४ घंटे टाळे असते. त्यामुळे हे उद्यान पालिकेने बंद केले कि अन्य कोणी ?, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
येथील नागरिकांना या उद्यानात चालण्यास, तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास अटकाव केला जात आहे. इतकेच नव्हे, तर लहान मुलांना खेळण्यासाठी आत जाऊन दिले जात नाही. परिणामी या परिसरातील लहान मुले संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावर खेळतांना आढळतात. त्यामुळे अनेकदा रस्त्यावरील वाहतुकीमुळे किरकोळ अपघातही झाले आहेत. याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत आहे.
या उद्यानामध्ये बाकड्यांची दुरवस्था झाली आहेत. तसेच उद्यानामधील गवतही मोठ्या प्रमाणात वाढले असून झाडांची नियमित छाटणी केली जात नाही. परिणामी डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. या प्रकरणी उद्यान विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून उद्यानाची देखभाल दुरुस्ती करून ते जनतेसाठी उघडे करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.