नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करून घेऊ ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
पुणे – शाळेतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराज अवगत व्हावेत, त्यांचे कर्तृत्व समजावे, यासाठी नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊ, असे प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी केले. पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून राजगड येथे सुखरूप परतल्याच्या ३५६ व्या सुटका स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील लाल महाल येथे लाक्षणिक पालखीचे प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लाक्षणिक पालखीचा प्रस्थान शुभारंभ लाल महालातून पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा स्मृती सोहळा श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ हे नियमितपणे ४२ वर्षांपासून करत आहे, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे पालकमंत्री म्हणाले. या वेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
पाटील पुढे म्हणाले की, छत्रपतींच्या काळातील विहिरी आणि तटबंदी अजूनही शाबूत असून त्या काळातील बांधकाम चांगले होते, ते कळते. शिवाजी महाराज आर्थिकतज्ञ आणि चाणाक्ष होते. नवीन अभ्यासक्रमात ७० टक्के व्यवसाय नोकरीसाठी ३० टक्के महापुरुषांची चरित्रे, योगा, कला इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थांना महाराजांचे कार्य कळण्यासाठी १०० गुणांचा पेपर ठेवण्यात येईल.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्र शासनाच्या या अभिनंदनीय निर्णयाची सर्वजण वाट पहात आहेत. असा निर्णय प्रत्येक राज्याने घ्यायला हवा ! पाठ्यपुस्तकांमध्ये पराक्रमी राजे, स्वातंत्र्यसैनिक यांचा इतिहास अंतर्भूत केल्यानेच भावी पिढीला आपला पराक्रमी, शूर राजांचा इतिहास समजेल आणि भावी पिढी राष्ट्राभिमानी होईल ! |