प्रत्येक साधकाच्या मनातील जाणणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती
१. आई-वडिलांनी लहानपणापासूनच साधनेचे संस्कार करणे
‘माझ्या लहानपणापासून माझे आई-वडील (सौ. मनीषा आणि श्री. रवींद्र परब) साधना करत आहेत. पूर्वी माझी सेवा कृतीच्या स्तरावर व्हायची. माझ्याकडून सेवा भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत नव्हते. माझे बाबा सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी मनातून बोलत असतात. तेव्हा त्यांची अनेक वेळा भावजागृती होते. ते मलाही पुष्कळ वेळा सांगण्याचा प्रयत्न करायचे, ‘‘तू परात्पर गुरु डॉक्टरांशी मनातून बोल. तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तू साधना म्हणून नाही केलेस, तरी तू प्रयोग म्हणून तरी करून बघ. तू थोडा वेळ नामजप कर आणि नंतर तुझ्या शंका सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांना सांग. ते तुला सूक्ष्मातून उत्तरे देतील.’’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सूक्ष्मातून बोलल्यावर मनातील शंकांचे निरसन होणे
मी बाबांनी सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ नामजप करून परात्पर गुरु डॉक्टरांशी मनातून बोलणे चालू केले. मी त्यांच्याशी मनातून बोलणे चालू केल्यावर माझ्या शंकांचे निरसन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्हायचे. तेव्हा मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटायची.
३. सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून ‘योग्य विचारप्रक्रिया कशी करायची ?’, हे शिकायला मिळणे
मला काही दिवस कुडाळ सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा तेथे मला स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व समजले. मी तेथे असतांना मला सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘योग्य विचारप्रक्रिया कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले. त्यामुळे आता माझ्याकडून प्रत्येक कृती करण्यापूर्वी तिचा सर्वांगांनी होणार्या परिणामांचा आधी विचार केला जातो आणि मगच ती कृती केली जाते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळकळीने प्रार्थना करणे आणि २ दिवसांनी ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होणार्या शिबिरात सहभागी व्हायचे आहे’, असे समजणे
१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या वेळी महर्षींच्या आज्ञेने झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती पहातांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. मी नकळत हुंदके देऊन रडू लागले. मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी मनातून कळकळीने प्रार्थना केली, ‘मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात यायचे आहे.’ त्यानंतर २ दिवसांनी उत्तरदायी साधकांनी मला सांगितले, ‘‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शिबीर आहे. तुम्हाला त्या शिबिरासाठी जायचे आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला आनंद झाला. मला परात्पर गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘परात्पर गुरुदेव प्रत्येक साधकाचा किती विचार करतात आणि त्यांचे प्रत्येक साधकावर किती लक्ष आहे’, हे माझ्या लक्षात आले.’
– कु. मेधा रवींद्र परब, ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग. (७.८.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |