भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !
४ डिसेंबरपर्यंत कोकण महोत्सवाचे आयोजन
मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. या वेळी भाजपचे आमदार श्री. मिहीर कोटेचा, महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे हेही उपस्थित होते. सनातनच्या साधिका सौ. आशा गंगाधरे यांनी श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्ष २०२३ चे ‘सनातन पंचांग’ भेट दिले.
सौ. आशा गंगाधरे यांनी श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने दिली. कोकण विकास आघाडीचे मुंबईचे अध्यक्ष श्री. सुहास आडीवरेकर यांनीही महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी सनातन ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन सात्त्विक उत्पादने खरेदी केली. मुलुंड सेवा संघ, महिला बचत गट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.