व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गया (बिहार) येथील कु. योगेश रंजित प्रसाद (वय ११ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. योगेश रंजित प्रसाद हा या पिढीतील आहेत !
सौ. आशा रंजित प्रसाद (आई)
१. चूक झाल्यावर प्रायश्चित्त घेणे
‘योगेशकडून चूक झाल्यावर तो लगेच प्रायश्चित्तही घेतो. एकदा माझ्याशी अयोग्य वर्तन करण्याची चूक झाल्यावर त्याने उन्हात उभे राहून ५ माळा नामजप करण्याचे प्रायश्चित्त घेतले आणि ते पूर्णही केले.
२. जाणवलेला पालट
या २ मासांपासून योगेशमधील ‘सांगितलेले ऐकणे आणि इतरांना साहाय्य करणे’, हे गुण वाढले आहेत.’
श्री. रंजित प्रसाद (वडील)
वडिलांना साधनेत साहाय्य करणे
‘मी स्वभावदोष-निर्मूलन सारणीचे लिखाण करण्यात सवलत घेतो. तेव्हा तो मला माझी सारणी आणून देतो आणि लिखाण करायला सांगतो. ‘ईश्वराने मला साधनेत साहाय्य करण्यासाठीच त्याला माझ्याकडे पाठवले आहे’, असे मला वाटते. त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
श्री. अमरजित प्रसाद (काका)
१. धर्माभिमान
‘योगेश ७ वर्षांचा असल्यापासून त्याला ‘अन्य पंथीय आपल्या धर्माचा कशा प्रकारे अपमान करतात ? आपला धर्म श्रेष्ठ कसा आहे ?’, याविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा आहे.
२. साधनेची तळमळ
त्याच्या आजीचे (माझ्या आईचे) व्यष्टी साधनेचे प्रयत्न पाहून तोही तसे प्रयत्न करतो. तो तिला मधे मधे येऊन विचारतो, ‘‘तुझा एवढा नामजप आणि प्रार्थना कशा होतात ?’’ आजीने सांगितलेले प्रयत्न ऐकून तो स्वतःही तसे प्रयत्न करतो.
३. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे
योगेश मला भ्रमणभाष करतो. तेव्हा तो व्यावहारिक गोष्टी न बोलता ‘तुमचा नामजप किती झाला ? तुम्ही स्वभाव-निर्मूलन सारणी लिहिली का ?’, असे प्रश्न मला विचारतो. तो त्याच्या आजोबांना (माझ्या वडिलांना) साधना करण्यासाठी उद्युक्त करतो. त्यामुळे आता त्याच्या आजोबांचेही साधनेचे प्रयत्न होत आहेत. त्याने आजीला सांगितले, ‘‘तुला प्राणशक्तीवहन उपचार पद्धतीनुसार नामजप शोधण्यात कुठलीही अडचण आली, तर तू मला सांगू शकतेस. मी तुला साहाय्य करू शकतो.’’
सौ. सानिका संजय सिंह (आत्या)
१. तळमळीने अन् सकारात्मक राहून साधनेचे प्रयत्न करणे आणि त्यानंतर गुरुकृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे
‘काही मासांपूर्वी योगेशची लहान बहीण चि. देवश्री (वय ३ वर्षे) हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढली नाही; म्हणून त्याला वाईट वाटले आणि तो रडला. त्याला समजावून सांगितल्यानंतर त्याने सकारात्मक राहून नियमितपणे व्यष्टी साधनेचे प्रयत्न केले. ‘गुरुदेवांच्या अखंड कृपेमुळेच योगेशची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
कु. मनीषा माहूर
१. व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे देणे
‘योगेश व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न नियमित करून आढावा देतो. कधी त्याला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात उपस्थित रहाता आले नाही, तर तो क्षमायाचना करून प्रायश्चित्त घेतो.
२. चूक झाल्यावर बहिणीची क्षमा मागणे आणि प्रायश्चित्त घेणे
एकदा योगेशला आणि त्याच्या बहिणीला चॉकलेट्स मिळाली होती. बहिणीने योगेशचे चॉकलेट घेतल्यावर त्याला राग आला. त्यानंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने बहिणीची क्षमा मागितली अन् प्रायश्चित्त म्हणून आपल्याकडील सर्व चॉकलेट्स तिला दिली.
३. सेवेची तळमळ
तो आईचे साहाय्य घेऊन आपल्या मित्रांना ‘ऑनलाईन’ सत्संगाची ‘लिंक’ पाठवतो आणि त्यांना ‘सत्संग पाहिला का ?’, असे विचारतो.’
कु. राशी खत्री
१. ‘गुरुपौर्णिमेच्या कालावधीत योगेशच्या घरी सेवेसाठी गेल्यावर तो सर्व साधकांची काळजी घेत होता.
२. गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्याला सेवा करायची इच्छा होती आणि त्याला सांगितलेल्या सर्व लहान-लहान सेवा तो तत्परतेने, परिपूर्ण अन् भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता.
३. एवढ्या लहान वयात त्याचे साधनेचे प्रयत्न पाहून त्याची प्रगल्भता लक्षात येते.’ (वर्ष २०२०)