चीनमध्ये ‘कोरा कागद’ बनले सरकारविरोधी आंदोलनाचे शस्त्र !

दळणवळण बंदीवरून चीनमध्ये सरकारच्या विरोधात वाढता जनक्षोभ !

कोरा कागद घेऊन निदर्शने करताना चिनी नागरिक

बीजिंग – ‘कोरा कागद’ हे चीनमधील अनेक शहरांमध्ये चालू असणार्‍या निदर्शनांचे मुख्य शस्त्र बनले आहे. सहस्रो लोक हातात कोरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत. चीनच्या ‘झिरो कोविड पॉलिसी’मुळे सरकारच्या विरोधात लोकांचा रोष वाढत आहे. आंदोलक बीजिंग, शांघाय आणि वुहान यांसारख्या मोठ्या शहरांच्या रस्त्यावर या अनोख्या पद्धतीने निदर्शने करत आहेत.

नुकतीच चीनच्या शिनजियांगची राजधानी उरुमकी येथील २१ मजली इमारतीला आग लागली. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण घायाळ झाले. ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी उरुमकीमध्ये कोरोना संसर्गामुळे दळवळणबंदी लागू केली होती. लोकांचा आरोप आहे की, कडक दळणवळण बंदीमुळे साहाय्य पोचण्यास विलंब झाला. त्यामुळेच एवढी मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे संतप्त लोक रस्त्यावर उतरून चीन सरकार आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग सरकार यांचा निषेध करत आहेत. शिनजियांगपासून चालू  झालेले हे आंदोलन थोड्याच कालावधीत बीजिंग, शांघाय, वुहान, चेंगडू आणि शिआनपर्यंत पोचले.

चीनच्या अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर कोरा कागद घेऊन राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या त्यागपत्राची मागणी करत आहेत. काही वेळातच, कोरा कागद हा सरकारविरोधी निषेधाचे प्रतीक बनला आहे. चीनमधील अशा निदर्शनांचा संबंध हाँगकाँगमधील २०२०च्या निषेधाशी जोडला जात आहे. शांघायच्या निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या एका महिलेचे म्हणणे आहे की, ‘कोर्‍या कागदावर काहीही लिहिलेले नाही; पण त्यावर काय लिहिले आहे, हे आम्हाला माहीत आहे.’