‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ यांवर १२ डिसेंबर या दिवशी निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार
मुंबई – ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि या पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ यांवर नेमका हक्क कुणाचा ? याविषयी १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या दोघांकडून पक्षाचे नाव अन् पक्षचिन्ह यांवर अधिकार सांगण्यात आला आहे.
मोठी बातमी! शिवसेना पक्ष, पक्षचिन्हावरील वादावर १२ डिसेंबरला पहिली सुनावणी, निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे निर्देशhttps://t.co/Iqg8IKWGR7#Shivsena #eknathshinde #uddhavthackeray
— LoksattaLive (@LoksattaLive) November 29, 2022
याविषयीचे पुरावे ९ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. मुंबईतील अंधेरी येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ कुणाचे ?, यांवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह असलेले ‘धनुष्यबाण’ गोठवले आहे. त्यामुळे अंधेरी येथील पोटनिवडणूक दोन्ही पक्षांनी नवीन चिन्ह घेऊन लढली. ही सुनावणी लवकर पूर्ण न झाल्यास महानगरपालिकेच्या निवडणुका दोन्ही पक्षांना नवीन चिन्हावर लढवावी लागेल.