लांजा (जि. रत्नागिरी) तालुक्यात अवैध गुरांची वाहतूक : बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी गाडी पकडली
लांजा – गुरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती येथील बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी सापळा रचून गुरांची वाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप ही गाडी पकडली. लांजा वाडगाव रोडवर बेनिखुर्द आसगे फाटा या ठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. १० गुरांसह बोलेरो मॅक्स पिकअप व्हॅन असा एकूण ४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध गुरांची वाहतूक करणारी गाडी बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी थांबवली असता गाडीच्या हौद्यामध्ये १० गुरे करकचून बांधून ठेवण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित गाडी चालकाला पकडले आणि लांजा पोलिसांच्या कह्यात दिले.
त्यानंतर पोलिसांनी विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी रफिक सैफनसाब शेख (उगार, कर्नाटक) तसेच गणेश लांबोर (तालुका लांजा) या दोघांवर प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम अन् भा.दं.वि.स. कलम ३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. या घटनेविषयी अधिक अन्वेषण लांजा पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करत आहेत.
संपादकीय भूमिकाजी माहिती हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलीस यंत्रणेला का मिळत नाही ! |