सतत होणार्या शारीरिक त्रासांवर गुरुकृपेने मात करून सेवारत रहाणार्या मूळच्या डोंबिवली येथील आणि आता फोंडा, गोवा येथे स्थायिक झालेल्या सौ. विद्या नलावडे !
१. साधनेत येण्याच्या आधीपासून देवाने योग्य निर्णय घेण्यास साहाय्य करणे
‘आमचे लग्न झाल्यावर आम्ही ८ वर्षे मुंबईला विद्याविहार येथे रहात होतो. ती खोली पुष्कळ लहान होती. मोठी मुलगी सौ. वेदश्री खानविलकर (पूर्वाश्रमीची कु. प्रणिता नलावडे) हिला सतत सर्दी आणि ताप असायचा. आम्ही रहात होतो, तेथून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेत मुलीला शिशुवर्गात अगदी सहजतेने प्रवेश मिळाला. मुलगी एक वर्षच त्या शाळेत गेली. तिच्या आजारपणामुळे आम्ही दुसर्या वर्षी डोंबिवली येथे घर घेऊन तिकडेच रहाण्यास गेलो. ‘देवाने आम्हाला ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून साधना करण्यासाठीच हा निर्णय घेण्याची बुद्धी दिली’, असे आम्हाला नंतर लक्षात आले.
२. सनातन संस्थेशी संपर्क
२ अ. सत्संगाला जाणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होणे : यजमानांच्या एक मित्राने त्यांना एकदा ‘सनातन संस्थे’च्या सत्संगाला घाटकोपर येथे बोलावले. तेथे गेल्यावर यजमानांना पुष्कळ चांगले वाटले. नंतर आम्ही लगेच दैनिक ‘सनातन प्रभात’ घेण्यास चालू केले. आम्ही सनातनचे ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’, ‘समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती’, ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हे ग्रंथ विकत घेतले.
२ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेतल्यावर आनंदाची अनुभूती येणे : वाचनाची फारशी आवड नसतांनाही मला प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचनाची पुष्कळ गोडी लागली. अजूनही मला दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेतल्यावर वेगळाच आनंद जाणवतो आणि माझी भावजागृती होते.
२ इ. ग्रंथ वाचनाची आवड निर्माण झाल्याने वेळेचा सदुपयोग होणे : माझ्या दोन्ही मुली लहान असतांना त्यांच्या शाळा सुटण्याच्या वेळेत एक – दीड घंट्याचे अंतर असायचे. तेव्हा घरी जाऊन परत शाळेत येण्यापेक्षा मी लहान मुलीची शाळा सुटल्यावर तेथेच बसून ग्रंथाचे वाचन करायचे. मला ग्रंथ वाचनाची एवढी आवड निर्माण झाली की, ‘मी कधी एकदाची शाळेत मुलीला घ्यायला जाते आणि त्या वेळेत ग्रंथ वाचते’, असे मला व्हायचे. एकदा एका मुलीची आई मला म्हणाली, ‘‘तुम्ही प्रतिदिन वाचन करता हे पुष्कळ चांगले आहे.’’
२ ई. साधना करतांना सेवेचा कालावधी वाढल्यावर शारीरिक त्रासांत वाढ होऊनही सेवारत रहाणे
२ ई १. शारीरिक त्रास होऊनही गुरुकृपेने सेवेत कधीही खंड न पडणे : मी नियमितपणे सत्संगाला जाऊ लागले. मी गुरुपौर्णिमेचा प्रसार करणे, ग्रंथ प्रदर्शन लावणे, या सेवा करू लागले. माझ्या सेवेचा कालावधी वाढू लागला, तसा मला शारीरिक त्रास होण्यास आरंभ झाला. मला प्रत्येक वर्षी वेगवेगळे त्रास होत होते. मला जवळजवळ २ मास मानदुखी होती. त्यानंतर मला सतत ‘तोंड येणे, २ – ३ मास जुलाबाचा त्रास होणे, अंगावर मोठे फोड येणे, ‘ॲलर्जी’ होऊन सतत शिंका येणे, सतत कणकण असणे’, असे त्रास होत होते. मी या त्रासांवर औषधे घेतल्यावर मला तेवढ्यापुरते बरे वाटायचे. वर्ष २०१५ मध्ये आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्या नाकाचे हाड वाढले आहे आणि शस्त्रकर्म करावे लागेल.’’ माझे त्यासंबंधी शस्त्रकर्म झाले, तरीही अजून मला तो त्रास होतच आहे. हे सर्व त्रास होत असतांना माझ्या मनात गुरुकृपेमुळे कधीही ‘सेवेला जायला नको’, असा विचार आला नाही किंवा मी कधीही झोपून राहिले नाही.
२ ई २. अनेक वैद्यकीय चाचण्या केल्यावर ‘आतड्यांचा क्षयरोग होण्याची शक्यता आहे’, असे समजणे आणि काही मास औषधोपचार घेतल्यावर प्रकृती ठीक होऊन सेवा करू शकणे : एकदा मी एक सेवा करण्यास आरंभ केला आणि त्या रात्री अकस्मात् माझ्या पोटात पुष्कळ दुखू लागले. दुसर्या दिवशी आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी केलेल्या उपचारांनी मला थोडे बरे वाटले; मात्र काही दिवसांनी मला तसाच त्रास होत होता. माझ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यावर जवळजवळ एक मासाने माझ्या आजाराचे निदान झाले. ‘माझ्या छातीत पाणी झाले असून मला आतड्यांचा क्षयरोग होण्याची शक्यता आहे’, असे समजले. या कालावधीत मी जवळजवळ ६ मास पूर्ण झोपूनच होते. त्यानंतर मला थोडे बरे वाटल्यावर मी सेवेला जाऊ लागले.
२ ई ३. डिसेंबर २०१७ मध्ये पुन्हा पोटदुखीचा त्रास होणे; मात्र वैद्यकीय चाचण्यांमध्ये काहीच न आढळणे, ओळखीच्या आधुनिक वैद्यांकडून गोळ्या घेतल्यावर बरे वाटणे : डिसेंबर २०१७ मध्ये भिवंडी येथील मैदानात मोठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. त्या कालावधीत मी भिवंडी येथे २० दिवस राहून सेवा केली. त्यानंतर मला पुन्हा पोटदुखीचा त्रास चालू झाला. माझ्या पुन्हा सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यात काहीही आढळले नाही. तेव्हा आधुनिक वैद्यांनी आणखी एक पोटाची चाचणी करण्यास सांगितली; पण मी भीतीमुळे ती चाचणी केली नाही. मी एका ओळखीच्या आधुनिक वैद्यांकडून पोटासाठी गोळ्या घेतल्या. त्यानंतर मला बरे वाटले.’
– सौ. विद्या नलावडे, फोंडा, गोवा. (१५.१.२०२१)
रुग्णाईत असतांना देवावरील भक्ती वाढवून अखंड अनुसंधानात रहाणार्या येथील सौ. विद्या नलावडे !
‘फेब्रुवारी ते मे २०२१ या ४ मासांच्या कालावधीत माझी प्रकृती बरी नसल्याने मला अधिक वेळ झोपून रहावे लागले. तेव्हा ‘अधिकाधिक नामजप आणि प्रार्थना करणे अन् अनुसंधानात रहाणे’, असे प्रयत्न देवाने माझ्याकडून करून घेतले. त्या वेळी मला शारीरिक त्रासाची अधिक जाणीव झाली नाही आणि माझे मन सतत आनंदी असायचे. आजारपणामुळे मला अधिकाधिक वेळ देवाच्या अनुसंधानात रहाता आले; म्हणून देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी देवानेच माझ्याकडून पुढील ओळी लिहून घेतल्या.
आजारपण म्हणजे देवाच्या अखंड अनुसंधानात रहाण्याची संधी ।
आजारपण म्हणजे देवाच्या अखंड
अनुसंधानात रहाण्याची संधी ।
आजारपण म्हणजे स्वतःतील
आत्मतत्त्व जागृत करण्याची संधी ।।
आजारपण म्हणजे स्वतःला विसरण्याची संधी।
आजारपण म्हणजे स्वतःकडे
त्रयस्थ राहून पहाण्याची संधी ।। १ ।।
आजारपण म्हणजे बाह्य गोष्टींचा विसर पडण्याची संधी ।
आजारपण म्हणजे ईश्वराचे तत्त्व
अधिकाधिक ग्रहण करण्याची संधी ।।
आजारपण म्हणजे ईश्वरच सत्य आणि बाकी सर्व मिथ्या, याची जाणीव होण्याची संधी ।
आजारपण म्हणजे मी आणि ईश्वर एवढेच अनुभवण्याची संधी ।। २ ।।
आजारपण म्हणजे देवाचे अफाट सामर्थ्य जाणण्याची संधी ।
आजारपण म्हणजे अखंड भावगंगेत डुंबण्याची संधी ।।
आजारपण म्हणजे विश्रांतीसाठी
मिळालेल्या वेळेचे सोने करण्याची संधी ।
आजारपण म्हणजे देवावरील
भक्ती वाढवण्याची संधी ।। ३ ।।
– सौ. विद्या नलावडे, फोंडा, गोवा. (९.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |