चीनमधील दुष्काळ आणि भारताने घ्यावयाची दक्षता !
‘जागतिक तापमानवाढीमुळे होणार्या हवामान पालटांमुळे कृषी क्षेत्रच नव्हे, तर एकूणच सर्वत्रच्या अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम होणार, तसेच तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढून अनेक शहरे बुडणार, जगाच्या एका भागात प्रचंड महापूर आणि दुसर्या भागात तीव्र दुष्काळ अशा घटनांचा शेतीवर विपरीत परिणाम होऊन अन्नसुरक्षा धोक्यात येणार’, असे एक ना अनेक अहवाल मागील दशकात प्रसिद्ध झाले. सध्या तरी हवामान पालटांचे परिणाम अधिक तीव्रतेने होतांना दिसत आहेत. संपूर्ण जगात विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने आणि जागतिक व्यापारातील आधिक्य टिकवण्याच्या दृष्टीने सतत कुरापती काढणार्या चीनला अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
१. चीनमधील दुष्काळाची व्याप्ती
चीनमध्ये येऊन गेलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात ४५ लाख चौरस किलोमीटरचे क्षेत्र, म्हणजे चीनचा जवळपास अर्धा भूभाग आला आहे. देशाच्या उत्तरेला असलेल्या हुबेई प्रांतानंतर हा दुष्काळ मध्य आणि दक्षिण भागांत पसरला आहे. या देशातील ६६ नद्या जवळपास आटल्या आहेत. तापमानवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने त्यांत जंगलसंपत्तीची मोठी हानी झाली आहे. आटलेल्या ६६ नद्यांपैकी महत्त्वाची ‘यांगत्से नदी’ (ही लांबीने जगातील तिसर्या क्रमांकाची मोठी नदी) ही असून चीनमधील ४० कोटींहून अधिक लोकसंख्येला ती पिण्याचे पाणी पुरवते. या नदीचा काही भाग आटला आहे. या नदीचे चीनच्या बलाढ्य अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान आहे. चीनने या नदीवर मोठ्या प्रमाणात जलविद्युत् प्रकल्पांचे जाळे उभारलेले आहे. आता हीच नदी आटल्यामुळे तेथील अनेक आस्थापनांना त्यांचे कामकाज थांबवावे लागले, तर सिचुआन प्रांतांमधील ८० टक्के जनतेला वीजटंचाईचा धक्का बसला आहे.
२. चीनच्या दुष्काळाचा कृषीक्षेत्रावर होणारा परिणाम
‘देशातील धान्य उत्पादनात मोठी घट होणार नाही’, असे स्वतः चीनने आणि ‘फीच’सारख्या जागतिक संशोधन संस्थांनी म्हटले आहे. तशीही चीनमधील नकारात्मक माहिती विशेष बाहेर जात नाही, तसेच देशांतर्गत प्रसिद्ध केलेल्या माहितीवर स्वतः चिनी नागरिकही फारसा विश्वास ठेवत नाहीत; परंतु ‘ब्लूमबर्ग’सारख्या प्रसिद्धीमाध्यमांच्या बातम्या आणि काही संशोधन संस्था यांच्या अहवालानुसार चीनमधील तांदळाचे उत्पादन १ ते १.४ कोटी टनांनी न्यून येऊ शकेल. मक्याच्या उत्पादनात २ ते ३ टक्के, म्हणजे ५० ते ७० लाख टन एवढीच घट येईल. चीनच्या अन्नधान्यातील अपेक्षित घट आयातीद्वारे भागवता येऊ शकेल. असे असले, तरी हवामानाच्या परिस्थितीत मोठा पालट झाला नाही, तर पुढील काळातील पिकांवर त्याचा निश्चितच परिणाम होईल. मागील वर्षभरात जगात महागाई वाढत असतांना चीन महागाईला लगाम घालण्यात यशस्वी झाला होता; परंतु आता मात्र त्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अनेक आस्थापने बंद पडून कामगार बेरोजगार होत आहेत.
३. भारताने देशातील अन्नसुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक
चीनमधील दुष्काळामुळे भारताला पुष्कळ मोठे लाभ होतील, अशी परिस्थिती नाही; कारण भारतात एवढा तीव्र दुष्काळ नसतांना केवळ महिन्याभराच्या उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात किमान ७० लाख ते १ कोटी टन, तर तांदळाच्या उत्पादनात अनुमानापेक्षा १ कोटी टन घट अपेक्षित आहे. या दोन्ही उत्पादनांच्या निर्यातीवर सरकारने याआधीच बंदी घातली आहे; पण ‘हंगामाच्या शेवटी आपल्याला आयात करावी लागेल’, असेही म्हटले जात आहे. मक्याच्या निर्यातीला संधी आहे; पण सरकारी पातळीवर असा निर्णय होणे कठीण आहे.
एकंदरीत पहाता चीनची डोकेदुखी भारताला लाभदायी ठरण्याची शक्यता फारशी नाही. जर चीनने कृषीमालाची आयात मोठ्या प्रमाणात चालू केली, तर अन्नधान्याच्या किमती वाढून महागाई अधिक तीव्र होऊ शकेल आणि त्यातून अनेक देशांची अन्नसुरक्षा धोक्यात येईल, हे निश्चित. त्यामुळे चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची सर्वच देशांना आवश्यकता आहे.’
– श्रीकांत कुवळेकर ( साभार : साप्ताहिक विवेक, १६.९.२२)