सातारा येथील बाँबे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर रस्त्यावर दोन्ही बाजूस पथदीप बसवण्याची मागणी !
सातारा, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – शहर परिसरात असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पथदीप बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
सध्या सातारा-सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र शहराजवळील बाँबे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर या परिसरात अत्यंत संथ गतीने काम चालू आहे. यामुळे रस्त्यावरून प्रवास करणार्यांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच रस्त्याच्या कडेला असणारे दुकानदार आणि रहिवासी यांनाही धुळीचा प्रचंड त्रास होऊन आरोग्यविषयीच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे काम पूर्णत: बंद झाले आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूस पथदीप नसल्यामुळे रात्री कोणताही अनर्थ घडू शकतो. यापूर्वी अंधारात अनेकवेळा लुटालुटीचे प्रकार घडले आहेत, तसेच अनेकवेळा माता-भगिनी-नागरिक यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून ये-जा करावी लागते. रस्त्यावरून वाहनेही भरधान वेगाने ये-जा करत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.
सध्या अनेक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चालू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते. ऊस वाहतूक करतांना ट्रॅक्टरवर कर्णकर्कश आवाजात गाणी लावून ट्रॅक्टरवाले ये-जा करत असतात. याचा त्रास परिसरात रहाणार्या नागरिकांना प्रतिदिन सहन करावा लागत आहे. अशा ट्रॅक्टरचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. |