आतंकवादाविरुद्ध भारताचा निकराचा लढा !
‘भारत देश स्वतंत्र झाल्यापासून गेली ७५ वर्षे आतंकवादाला तोंड देत आहे. या आतंकवादामुळे जीवित आणि राष्ट्रीय संपत्तीची अपरिमित हानी झाली. देशातील संपूर्ण वातावरणही बिघडून गेले. भारतातीलच अनेकांना आतंकवादामुळे होणार्या हानीपेक्षा आतंकवाद्यांविषयीच अधिक जिव्हाळा आहे. ‘देशातील सर्वच मुसलमानांना एका तराजूत तोला’, असे कुणीही म्हणत नाही; पण ‘ज्या लोकांमुळे देशाची हानी होते आणि समाजातील वातावरण बिघडते, त्यांना पाठीशी घालण्यात कोणते राष्ट्र्रहित आहे ?’, हा विचार करण्यास आतंकवादाचा कैवार घेणारे सिद्ध होत नाहीत.
१. अमानवीयता आणि राक्षसी प्रवृत्ती ठेचणे, ही अहिंसाच !
वैचारिक मतभेद असू शकतात. एखादे तत्त्वज्ञान आपल्याला मान्य नसले, तरी त्या तत्त्वज्ञानाचा पक्ष घेणारे आपले शत्रू नसतात. कोणतेही तत्त्वज्ञान सत्य, नैतिकता आणि न्याय या पायावर उभे असते. सत्य, नैतिकता आणि न्याय यांना मूठमाती देऊन मांडलेले विचार म्हणजे तत्त्वज्ञान नाही. आतंकवादाची पाठराखण करणार्या लोकांचे तत्त्वज्ञान सत्य, नैतिकता आणि न्याय यांना भूमीत गाडून निर्माण झालेले आहे. अमानवीयता आणि राक्षसी प्रवृत्ती यांना दया दाखवता येत नाही. अशा प्रवृत्तीशी क्षमाशीलतेने वागता येत नाही; कारण राक्षसी प्रवृत्तीचा सत्य, नैतिकता आणि न्याय यांच्याशी संबंध नसतो. आतंकवाद ही राक्षसी प्रवृत्ती आहे. ती सर्वसामान्य लोकांना सुखाने आणि शांतपणे जीवन जगू देत नाही. अशी राक्षसी प्रवृत्ती ठेचणे, हाच न्याय आणि अहिंसा आहे.
२. पुरोगामी आणि तथाकथित विचारवंत यांनी आतंकवाद्यांना पाठीशी घातल्याने भारतात विविध माध्यमांतून फोफावलेला आतंकवाद !
आतंकवाद्यांच्या क्रूरतेला पाठीशी घालून त्यांचा उदोउदो करणे आणि आतंकवादाचा बीमोड करणार्यांना गुन्हेगार ठरवणे याला ‘विद्वत्ता’ म्हणत नाहीत. आजपर्यंत भारतात आतंकवाद्यांनी रक्ताचे पाट वाहिले आहेत, संसदेवर आक्रमण केले, मुंबईमधील १८५७ च्या स्मारकाचा विध्वंस केला आणि आता देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था प्रस्थापित केली. त्यांच्या दुष्टतेच्या क्रौर्याला अंत नाही. अशा राक्षसी प्रवृत्तीला पोषक ठरणार्या गोष्टी आपल्या देशातील पूर्वीच्या शासनकर्त्यांनी केल्या. त्यामुळेच वक्फ बोर्डाने अवैध मार्गाने देशातील भूमी स्वतःच्या कह्यात घेतली. याच संस्थेने तमिळनाडूतील एक संपूर्ण गाव स्वतःच्या नावावर करून घेतले. गुजरातमधील द्वारका बेटावरही सुन्नी वक्फ बोर्डाने त्यांचा मालकी हक्क प्रस्थापित केला. अशा प्रवृत्तीच्या पाठीशी जेव्हा तथाकथित विचारवंतांचा समूह उभा रहातो, तेव्हा देशाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य यांना आव्हान केल्यासारखे असते. ‘ही गोष्ट देशातील तथाकथित विचारवंतांच्या लक्षात येत नाही’, असे म्हणता येत नाही.
चीन आणि पाकिस्तान हे भारताचे शत्रू आहेत. त्यांनीच भारतात जाणीवपूर्वक आतंकवाद रुजवला. आपल्याच देशातील बांधवांना भरपूर पैसे दिले आणि शस्त्रास्त्रे पुरवली. या आतंकवादी कारवायांमुळे देशाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य यांना धोका निर्माण झाला आहे. घुसखोरी ही भारताची मोठी समस्या आहे. आता या आतंकवादाने संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडले आहे.
३. जागतिक आतंकवाद संपवण्यासाठी भारताने घेतलेला पुढाकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जगातील आतंकवाद पूर्णपणे नष्ट केल्यावाचून स्वस्थ बसणार नाही’, असा निर्धार केला आहे. यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. आतंकवाद्यांना पैसा मिळू नये, यासाठी सरकार गेली ४ वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. वर्ष २०१८ मध्ये ‘नो मनी फॉर टेरर’ (आतंकवादासाठी निधी न देणे) परिषद फ्रान्समध्ये झाली होती. त्या वेळी ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘अल् कायदा’ यांसारख्या जागतिक आतंकवादी संघटनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यानंतरची दुसरी परिषद नोव्हेंबर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आली होती. कोविड महामारीच्या काळात २ वर्षे कोणतीही बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर तिसरी परिषद १८ आणि १९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी देहली येथे झाली.
आतंकवाद पूर्णपणे संपवण्यासाठी विद्यमान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ‘नो मनी फॉर टेरर सेक्रेटरीयेट’ची (आतंकवादासाठी निधी न देण्यासाठी मंत्रालयाची) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. इस्लामी आणि खलिस्तानी आतंकवाद, ईशान्य भारतात होणारी घुसखोरी आणि फुटीरतावादी यांच्याशी लढण्याचा भारताला जेवढा अनुभव आहे, तेवढा अन्य कोणत्याही देशाला नाही. आपल्या देशात ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या माध्यमातून आतंकवाद्यांना मिळणार्या निधीवर बारीक लक्ष ठेवले जाते.
४. जगातील आतंकवाद संपवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ७२ देश संघटित होणे
जगातील आतंकवाद सध्या बळावत आहे. त्या मागचे कारण, म्हणजे चीन आणि पाकिस्तान यांसारखे काही देश राज्यकारभाराचा एक भाग म्हणून आतंकवादाचा उपयोग करतात. आतंकवादी संघटनांना बाहेरच्या देशातून अर्थ आणि शस्त्रास्त्रे यांचा पुरवठा सातत्याने होत असतो. शस्त्रास्त्रांची खरेदी, आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे, तसेच विविध ठिकाणी जाऊन आतंकवादी कृत्य करणे यांसाठी आतंकवाद्यांना पैसा लागत असतो. ज्या देशात आतंकवाद्यांनी आश्रय घेतला आहे, त्याच देशातून त्यांना अर्थपुरवठा होतो. बाहेरच्या देशातील स्वयंसेवी संघटना आणि धर्मादाय संस्था अशा संस्था अन् अमली पदार्थांची तस्करी यांतूनही अर्थपुरवठा होतो. ‘क्रिप्टो करन्सी’च्या (आभासी चलनाच्या) माध्यमातून अर्थपुरवठा होतो. हा अर्थ आणि शस्त्रास्त्रे पुरवठा आतंकवाद्यांपर्यंत पोचू नये, यावर उपाययोजना करण्यासाठी ७२ देश एकत्र आले आहेत. १५ आंतरराष्ट्रीय संघटनांनीही आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी यात सहभाग घेतला आहे.
मानवाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी देशात शांतता आणि सुव्यवस्था यांची नितांत आवश्यकता असते. आतंकवादामुळे शांतता आणि सुव्यवस्था यांना सुरूंग लागतो. परिणामी सर्वसामान्य माणसाला तणावपूर्ण वातावरणात जीवन जगावे लागते. हे लक्षात घेऊन आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील ७२ देश आतंकवाद्यांच्या उच्चाटनासाठी संघटित झाले आहेत. सुसंस्कृत आणि सभ्य समाजाच्या निर्मितीसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (२२.११.२०२२)