शूरांचे दैवत स्कंद म्हणजेच खंडोबा !
आज, २९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ‘चंपाषष्ठी’ आहे. त्या निमित्ताने…
मार्गशीर्ष शुक्ल ६ हा दिवस ‘चंपाषष्ठी’ म्हणून देवीचे किंवा खंडोबाचे पूजन करण्यात येते. या दिवशी सर्व शिवालयांतून देवीचा उत्सव चालू असतो. जेजुरी, पाली, मंगसुळी आदी खंडोबादेवाच्या स्थानाच्या ठिकाणी या दिवशी प्रेक्षणीय उत्सव होत असतो. ‘शंकराने खंडोबाचा अवतार घेतला आणि मणीमल्ल नावाच्या दैत्याला ठार केले’, अशी कथा आहे. खंडोबाची पत्नी ‘म्हाळसा’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यामुळे शंकराला ‘मल्हारी म्हाळसाकांत’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे कुलदैवत खंडोबा हे आहे. क्षत्रिय बाण्याचा देव म्हणून मराठ्यांना हा विशेष प्रिय वाटतो. ‘जयाद्रि माहात्म्य’ यात या खंडोबादेवाचे महत्त्व वर्णन केले आहे. रामोशी, धनगर जातीचे लोक हेही खंडोबाची उपासना करतात. प्राणीवर्गांत कुत्र्याच्या रूपात खंडोबा वास करतो, अशी समज आहे.
‘स्कंद या संस्कृत शब्दाचे रूप खंड. त्याचे ममतादर्शक रूप खंडू म्हणजे महाराष्ट्रातील जेजुरी, पाली वगैरे ठिकाणचे खंडोबा मूळचे स्कंद होत. स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी. स्कंद ही शूर आणि योद्धे यांची देवता म्हणून पुष्कळ पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. शूर वीर लोक याची उपासना करतात’, अशी माहिती ज्ञानकोशात मिळते. कित्येक घराण्यांतून मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासूनच या देवतेचा उत्सव चालू होतो.
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)