भगवंताचे दर्शन घडण्यासाठी साधनारूपी तपस्या करा ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन यांच्या सत्कार सोहळ्यात साधकांना केलेले मार्गदर्शन !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

फोंडा (गोवा) येथील साधिका श्रीमती भारती पालन यांनी ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. या सत्कार सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

सनातनच्या आश्रमांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. अशा चैतन्यमय क्षेत्री साधनेचे प्रयत्न झोकून देऊन केले, तर जलद आध्यात्मिक उन्नती होते. ज्या ज्या ठिकाणी साधक साधनेचे प्रयत्न करत आहेत, अशा भूतलावरील प्रत्येक ठिकाणी गुरुदेवांच्या चैतन्याचा स्रोत कार्यरत आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे, हा साधनेतील मोठा टप्पा आहे. आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर मन स्थिर होते आणि साधकाच्या मनोलयाला प्रारंभ होतो. साधक देवाच्या अधिक जवळ जातो. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांकडून शिकून अन्य साधकांनीही साधनेच्या प्रयत्नांची गती वाढवावी.

१. अल्पसंतुष्ट न रहाता अधिकाधिक प्रयत्न करा !

साधना करत असतांना ‘आपले मन मायेत अडकले आहे का ?’, ‘दोष आणि अहं मध्ये अडकले आहे का ?’, ‘कोणत्या साधकासमवेत काही प्रसंग घडला असल्यास त्या प्रसंगामध्ये, परिस्थितीमध्ये अडकले आहे का ?’, याचे चिंतन करा. प्रत्येक वेळी आपण कोणत्या टप्प्याला थांबलो आहोत, हे शोधून प्रयत्न करा. अन्यत्र अडकलेले मन देवाच्या दिशेने प्रवाहित करूया. ‘मी झोकून देऊन प्रयत्न करते’, असे स्वतःच न ठरवता ‘मी साधनेत झोकून देऊन प्रयत्न करते’, असे ईश्वराला वाटते का ?, याचे चिंतन करा. साधनेत अल्पसंतुष्ट न रहाता अधिकाधिक प्रयत्न करूया.

२. जो तळमळीने प्रयत्न करतो, त्याला ईश्वर साहाय्य करतो !

पूर्वीच्या काळी संत पुष्कळ यातना सहन करून घोर तपस्या करत असत. त्यानंतर त्यांना भगवंताचे दर्शन होत असे. देव सहजासहजी भेटत नाही. संतांप्रमाणे आपणही कोणतीही सवलत न घेता साधनारूपी तपस्या करूया. ‘सेवा करत असतांना कृतीला भावाची जोड दिली का ?’, ‘भावस्थिती किती काळ अनुभवू शकतो ?’, याचा प्रत्येकाने मधे मधे आढावा घेऊया. ‘देव हिंदु राष्ट्र देण्यासाठी सिद्ध आहे; पण आपण त्यासाठी पात्र आहोत का ?’, याचे साधकांनी चिंतन करावे.

जो तळमळीने प्रयत्न करतो, त्याला ईश्वर साहाय्य करतो. तळमळीला साधनेत ८० टक्के महत्त्व आहे. तळमळ नसेल, तर ईश्वराचे साहाय्यही ग्रहण करता येत नाही. तळमळीचे साधनेतील महत्त्व लक्षात घेऊन झोकून देऊन प्रयत्न करा.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीप्रमाणे अंत:करणात गुणांचे दीप लावून आंतरिक दीपोत्सव साजरा करा !

दिवाळीत आपण घराची स्वच्छता करतो. आकाशदीप लावतो आणि पणत्यांचा दीपोत्सवही साजरा करतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो. बाह्य दीपांप्रमाणेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्याला अंत:करणात गुणांचे दीप लावून आंतरिक दीपोत्सव साजरा करायला शिकवले आहे. गुरुदेवांनी आपल्या सर्वांच्या मोक्षप्राप्तीचा संकल्प केला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी साधनेच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करूया आणि प्रयत्न करण्यातील आनंद घेऊया !

४. आध्यात्मिक उन्नतीद्वारे साधकरूपी पणती गुरुचरणी प्रज्वलित !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याद्वारे एक साधकरूपी पणती गुरूंच्या चरणी प्रज्वलित झाली आहे. साधक जन्म-मृत्यूचा फेरा चुकवून भगवंताच्या चरणी लीन होतो, तेव्हा तो एकप्रकारे समष्टीसाठी भगवंताचे चैतन्य प्रक्षेपित करण्याचे एक माध्यम बनतो. अशा साधकांच्या सहवासात आपल्याला त्यांचे गुण शिकता येतात, तसेच त्यांच्याकडून सूक्ष्म स्तरावर प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा लाभही समष्टीला होत असतो. आध्यात्मिक उन्नती केलेल्या साधकांच्या अस्तित्वाने वातावरणाचीही शुद्धी होते.

सनातनचे साधक श्रीविष्णुचे परमधाम असलेल्या विष्णुलोकातही गुरुकृपेने स्थान प्राप्त करतील, हे निश्चित ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार उघडे असते. वैकुंठ चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या कृपेने सनातनमधील एक जीव जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे, याचा अर्थ प्रत्यक्षातच श्रीविष्णूने वैकुंठाचे द्वार साधकांसाठी उघडलेच आहे. आपली भक्ती वाढवून त्या द्वारातून आपण प्रवेश करणे बाकी आहे, याचीच भगवंताने प्रचीती दिली आहे. आपण सर्वांनीही आपल्या अंतरातील साधनेची, श्रीविष्णुप्राप्तीची तळमळ वाढवूया, भक्ती वाढवूया आणि मोहमायेचे सर्व बंध तोडून विष्णुद्वारातून प्रवेश करूया !

श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांनी साधना करण्यासाठी इच्छुक असलेल्या, ईश्वरप्राप्तीची तळमळ असलेल्या जिवांसाठी या भूलोकातील वैकुंठलोकाची (सनातनच्या रामनाथी आश्रमाची) द्वारे ३६५ दिवस खुलीच ठेवली आहेत. येथे प्रवेश करणारा प्रत्येक जीव पुढे श्रीविष्णूचे परमधाम असलेल्या विष्णुलोकातही गुरुकृपेने स्थान प्राप्त करेल, हे निश्चित आहे !

स्वतःच्या मनातील अयोग्य विचारप्रक्रिया आहे, त्याच तीव्रतेने मांडून उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घेतल्यास लवकर पालट करता येतो ! : ‘एका सत्संगात एका साधिकेने त्यांच्या मनातील अयोग्य विचारप्रक्रिया मनात आहे, त्याच तीव्रतेने मांडली. त्याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर काही कालावधीने झालेल्या दुसर्‍या सत्संगात तिच्या सहसाधिकांनी साधिकेच्या बोलण्यात पालट झाल्याचे स्वतःहूनच सांगितले. प्रारंभी साधिकेच्या मनातील अडथळे पुष्कळ तीव्र असले, तरी त्यांनी प्रांजळपणे ते त्याच तीव्रतेने मांडल्यामुळे पालट घडण्याची प्रक्रियाही गतीने आरंभ झाली.

या उदाहरणातून लक्षात येते की, उत्तरदायी साधकांकडून व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन घेतांना, आढावा सत्संगात साधनेतील दोष-अहंच्या स्तरावरील अडथळे सांगतांना ते मनात ज्या तीव्रतेने आहेत, त्याच तीव्रतेने सांगितले, तर उत्तरदायी साधकांना आपल्या दोषांची तीव्रता कळून अचूक मार्गदर्शन करता येते. त्यामुळे दोष-अहंच्या पैलूंमध्ये पालट घडण्याची प्रक्रियाही जलद गतीने होते. त्यामुळे दोषांची तीव्रता लवकर अल्प होण्यास साहाय्य होते. आपण स्वतःच्या मनातील अयोग्य विचारप्रक्रिया सांगतांना मोजून-मापून, स्वतःला सांभाळून सांगितली, तर पालट होण्याची गतीसुद्धा अल्पच असते.’ (६.११.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.