प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने साधना करणार्या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्या ऐरोली (नवी मुंबई) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंगल लोंढे (वय ६२ वर्षे) !
‘श्रीमती मंगल लोंढे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब साधनेत आहे. त्या मागील २२ वर्षांपासून साधना करत आहेत. त्यांची ३ मुले आणि २ स्नुषा प्रासंगिक सेवा करतात. श्रीमती मंगल लोंढे यांचा परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे.
१. सकारात्मक आणि आनंदी
‘लोंढेकाकूंना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही त्या नेहमी सकारात्मक अन् आनंदी असतात. ऐरोली येथे साधकसंख्या अल्प आहे, तरीही त्यांच्या मनात कुठेही नकारात्मकता नसते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समवेत आहेत आणि तेच माझ्याकडून सर्व करून घेणार आहेत’, असा त्यांचा भाव असतो.
२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
सेवांची व्यस्तता असतांनाही काकू व्यष्टी साधना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. सकाळी सेवेला जाऊन आल्यानंतर त्या दुपारी व्यष्टी साधना पूर्ण करतात.
३. सेवेची तळमळ
अ. त्या सेवेचे नियोजन लिहून ठेवतात. गुरुपौर्णिमेच्या वेळी ‘उद्या कोणत्या इमारतींमध्ये प्रसारासाठी जायचे ? किती वाजता जायचे ? समवेत काय न्यायचे ?’, याचे चिंतन त्या आदल्या दिवशी करतात.
आ. त्यांनी ‘किती दिवसांमध्ये किती सेवा पूर्ण होऊ शकतात ?’, याचा गेल्या वर्षीच्या अनुभवावरून अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी ‘गुरुपौर्णिमेच्या किती दिवस आधी सेवा चालू करायची ?’, याचे नियोजन केले होते.
इ. काकू अन्य सेवेला जातांनाही गुरुपौर्णिमेनिमित्त घेण्याच्या विज्ञापनांसाठीची आवेदनपत्रे (आरो) समवेत ठेवतात. एकदा आम्ही एका मंदिराची स्वच्छता करत होतो. त्या सेवेसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक आले होते. त्यातील काही वाचकांनी गेल्या वर्षी विज्ञापने दिली होती. काकूंनी त्या वाचकांकडे विज्ञापनांसाठी विचारणा केल्यावर त्या वाचकांनी लगेच विज्ञापने दिली.
ई. गुरुपौर्णिमेच्या आधी काकूंनी प्रतिदिन ५ घंटे सेवा करण्याचे ध्येय घेतले होते. ‘ते ध्येय पूर्ण व्हावे’ यासाठी त्या प्रतिदिन देवाला प्रार्थना करत होत्या. एकदा काही कारणामुळे काकूंच्या समवेत सेवेला जाण्यासाठी साधक उपलब्ध नव्हते. काकूंना होत असलेल्या त्रासामुळे त्या एकट्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या. तेव्हा काकूंना पुष्कळ वाईट वाटले. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर बसून रडल्या. त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना कळवळून प्रार्थना केली, ‘देवा, माझी ५ घंटे सेवा कशी पूर्ण होणार ? माझ्या समवेत सेवा करण्यासाठी साधक उपलब्ध होऊ दे.’ त्याच्या दुसर्या दिवशीच सकाळी काकूंना धर्मशिक्षणवर्गातील एका महिलेने भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मी प्रतिदिन सकाळी २ घंटे तुमच्या समवेत सेवेला येऊ शकते.’’ तेव्हा काकूंना फार कृतज्ञता वाटली. ‘परात्पर गुरु डॉक्टर मनातील सर्व जाणतात’, असा काकूंचा भाव असतो.
४. भाव
अ. सेवेला बाहेर पडल्यावर त्या सतत स्थानदेवता, वास्तुदेवता आणि क्षेत्रपाल देवता यांना प्रार्थना करतात.
आ. काकूंना सहसाधक, वाचक, जिज्ञासू आणि विज्ञापनदाते यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘या सर्वांना प.पू. गुरुदेवांनी मला भेटायला पाठवले आहे’, असा त्यांचा भाव असतो.
इ. ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना माझ्या समवेत सेवेला पाठवतात’, असे त्यांना सतत जाणवते.
ई. ‘गुरुमाऊली आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या कृपेमुळे मी त्रासावर मात करून सेवेला बाहेर पडू शकते’, असे त्या नेहमी म्हणतात.
उ. सेवा करून आल्यावर काकूंची पुष्कळ भावजागृती होते.
ऊ. ‘मला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे नीट बोलता येत नाही. देवच माझ्याकडून बोलून घेतो. ‘तो समोरच्या व्यक्तीला काय सांगतो ?’, ते मला ठाऊक नाही. परात्पर गुरु डॉक्टरच असे करून घेऊ शकतात’, असे त्या सतत सांगतात. त्या म्हणतात, ‘‘माझ्या घरातही आपत्काळ चालू आहे. त्यावर मात करायला परात्पर गुरु डॉक्टर मला शक्ती आणि भक्ती देतात.’’
ए. ‘मी जिवंत आहे’, ही गुरुदेवांची कृपा आहे’, असे त्या नेहमी सांगतात.
५. अनुभूती
५ अ. प्राणशक्ती न्यून झाली असतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या वाचिकांचे नूतनीकरण करण्यासाठी गेल्यावर एकाच वाचिकेच्या घरी अन्य दोन वाचिकांची भेट होणे आणि त्यांनी नूतनीकरण करणे : एकदा काकूंची प्राणशक्ती न्यून झाली होती, तरी त्या सनातन प्रभात नियतकालिकांचे नूतनीकरण करण्यासाठी वाचकांकडे गेल्या. त्या परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून सतत सांगत होत्या, ‘भगवंता, तूच मला घेऊन जाणार आहेस. तूच मला शक्ती देत आहेस.’ त्या वाचिका एकाच इमारतीत ३ वेगवेगळ्या ठिकाणी रहातात. काकू एका वाचिकेकडे गेल्या असतांना त्यांच्या घरी अन्य २ वाचिका आल्या होत्या. जणू काही त्या काकूंची वाट पहात होत्या. एकाच ठिकाणी तीन वाचिकांचे नूतनीकरण झाले आणि त्यांनी ७०० रुपयांची सनातनची सात्त्विक उत्पादनेही घेतली. ‘हे सर्व देवानेच केले. देवाला माझी किती काळजी आहे !’, असा काकूंचा भाव होता.
५ आ. एकदा काकूंचे डोके फार दुखत होते. तेव्हा त्यांनी परात्पर गुरुदेवांचा धावा केला. तेव्हा त्यांना ‘डोक्यावर फुलांचा सडा पडत आहे’, असे दिसले.
५ इ. एकदा त्यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना प्रार्थना केली. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांना श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात दिसल्या.’
– सौ. प्रीती गुरव, परळ (मुंबई) (१६.८.२०१९)
|