सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी उघड्यावर मद्यपान !
प्रशासनाची डोळेझाक !
सोलापूर, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – रेल्वे स्थानक परिसरात अनेक मद्यपी रात्रीच्या वेळी उघड्यावर मद्यपान करत असल्याचे आढळत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणार्या प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. या परिसरापासून रेल्वे स्थानक पोलीस चौकी केवळ ३०० मीटर अंतरावर असूनही हा प्रकार सर्रास चालू असल्याचे दिसून येत आहे. (परिसरात उघड्यावर मद्यपान करणार्यांवर पोलीस प्रशासनाचा कसलाही वचक नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? या प्रकाराकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक तर करत नाही ना ? – संपादक)
सोलापूर रेल्वे स्थानक ते डफरीन चौक रस्त्यावर महानगरपालिकेचे बस स्थानक आहे. येथे अनेक मद्यपी मद्यपान करतात. बसस्थानकाच्या भोवती शीतपेयाची लहान दुकाने आहेत. या दुकानांतूनच मद्यपींना मद्य उपलब्ध होते. हा प्रकार उघडकीस येऊ नये, यासाठी मद्याच्या बाटल्या, वापरलेले प्लास्टिकचे पेले कचरा उचलणार्या व्यक्तींकडून गोळा केले जातात. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असूनही मद्यपींवर कोणतीही कारवाई होत नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.