रुग्णालयात रुग्णांना साधना शिकवणारे आणि भगवान श्रीकृष्णाचे अनुसंधान अनुभवणारे नगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. रवींद्र भोसले !
‘डॉ. भोसले हॉस्पिटल’ हे देवाने मला साधना करण्यासाठीचे माध्यम म्हणून माझ्यासाठी उभारले आहे’, असे मला वाटते. देव आपला पिता आहे. त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. त्यामुळे देवाने अनेक वेळा मला ‘जे आपल्यासाठी आवश्यक असते, तेच देव आपल्याला देत असतो’, याची प्रचीती दिली आहे. त्यामुळे माझी देवावर श्रद्धा वाढली. माझी व्यष्टी प्रकृती आहे. त्यामुळे देव माझ्याकडून रुग्णालयात राहून व्यष्टीच्या समवेत समष्टी साधना करवून घेत आहे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
सर्वच व्यावसायिकांनी डॉ. रवींद्र भोसले यांच्या कृतीतून शिकून स्वतःची समष्टी साधना होण्यासाठी प्रयत्न करावेत !‘साधना करणे’ हाच जीवनातील सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय आहे. केवळ स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे’, म्हणजे ‘व्यष्टी साधना’, तर ‘स्वतःसह समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीही प्रयत्न करणे’, म्हणजे ‘समष्टी साधना’ होय. ‘स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय करत असतांनासुद्धा समष्टी साधना कशी करता येते’, याचा आदर्श डॉ. रवींद्र भोसले यांनी घालून दिला आहे. रुग्णांमध्ये राष्ट्राभिमान जागृत होण्यासाठी रुग्णालयात राष्ट्रगीत लावणे, रुग्णाच्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक आहे ? हे नेमकेपणाने शोधणे, तसेच रुग्णाचे त्रास मुळापासून जावेत आणि त्याला आनंद मिळवता यावा, यासाठी रुग्णांना साधना शिकवणारे डॉ. रवींद्र भोसले हे एकमेव डॉक्टर असावेत. सर्व डॉक्टरांनीच नव्हे, तर व्यावसायिकांनीही असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. भावी हिंदु राष्ट्रात सर्व व्यावसायिक अशा वृत्तीचे असतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
१. बाह्य रुग्ण विभाग (‘ओपीडी’ला) आरंभ करण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणे
लोकांमधील राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी बाह्य रुग्ण विभाग आरंभ करण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याचा एक चांगला उपक्रम देवाने मला सुचवला. प्रतिदिन बाह्य रुग्ण विभागाचा आरंभ करण्याआधी सर्वांना राष्ट्रगीतासाठी उभे रहायला सांगितले जाते. राष्ट्रगीत ऐकल्यानंतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांनाही चांगले वाटते.
२. रुग्णालयात होत असलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय
२ अ. रुग्णालयात सर्व ठिकाणी कापूर आणि वेखंड यांचे मिश्रण ठेवणे : फुलपात्रामध्ये कापूर आणि वेखंड यांचे मिश्रण घेऊन ते बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी), सर्वसाधारण कक्ष, शस्त्रकर्म विभाग (ऑपरेशन कक्ष), विशेष कक्ष (स्पेशल रूम) इत्यादी ठिकाणी उपायांसाठी ठेवले आहे. त्यामुळे अनेकांनी ‘रुग्णालयातील वातावरण प्रसन्न असते’, असे अनुभवले आहे.
२ आ. शस्त्रकर्म विभागात उदबत्ती लावून ठेवणे : शक्य असेल, तेव्हा प्रत्येक छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियेच्या आधी शस्त्रकर्म विभागामध्ये ‘सनातनची चंदन उदबत्ती’ लावली जाते. त्यामुळे देवाने मला ‘शस्त्रकर्म लवकर आणि निर्विघ्नपणे होते’, अशी अनुभूती दिली आहे.
३. स्वतःवर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण काढल्यावर आलेल्या अनुभूती
३ अ. रुग्णांना तपासल्यानंतर स्वतःवर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण काढल्यावर थकवा येण्याचे प्रमाण न्यून होणे : पूर्वी रुग्णांना तपासल्यानंतर मला वारंवार थकवा येणे आणि डोके जड होणे, असे त्रास व्हायचे. ‘हा थकवा शारीरिक आहे’, असा विचार करून मी थोडा वेळ विश्रांती घ्यायचो. काही वेळा विश्रांती घेऊनही मला बरे वाटायचे नाही. त्यानंतर एक दिवस देवाने मला स्वतःवर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण काढायला सुचवले. मी १० मिनिटे आवरण काढल्यावर मला चांगले वाटू लागले आणि माझे सर्व त्रास नाहीसे झाले. तेव्हापासून प्रत्येक रुग्ण तपासून झाल्यावर दुसरा रुग्ण आत येण्याआधी मी स्वतःवरील आवरण काढतो. त्यामुळे मला थकवा येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे.
३ आ. मी प्रत्येक शस्त्रक्रिया करण्याच्या आधीही स्वतःवरील आवरण काढतो. त्यामुळे मला शस्त्रक्रिया करतांना थकवा जाणवत नाही आणि शस्त्रक्रियेला वेळही अल्प लागतो.
४. रुग्णांना तपासतांना आणि शस्त्रक्रिया करतांना स्वतः नामजप करण्यासाठी प्रयत्न करणे
श्री गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) म्हटल्याप्रमाणे मी श्रीकृष्णाचा जप करत रुग्णांना तपासतो. शस्त्रक्रिया करतांना माझा नामजप मधे मधे बंद पडतो. हे लक्षात आल्यावर मी तो पुन्हा चालू करतो.
५. रुग्णांना साधना शिकवणे आणि त्यांची देवावर श्रद्धा वाढण्यासाठी प्रयत्न करणे
माझ्याकडे येणार्या जिज्ञासू रुग्णांना मी साधनेचे महत्त्व सांगतो आणि ज्या रुग्णांची साधना करण्याची इच्छा अन् संमती असते, त्यांच्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करतो.
५ अ. रुग्णांना त्यांच्या त्रासाचे कारण सांगून त्याचे निवारण होण्यासाठी नामजप करण्यास सांगणे : श्री गुरुदेवांच्या कृपेमुळे बाह्य रुग्ण विभागात येणार्या रुग्णांना त्यांच्या त्रासाचे कारण हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक यांपैकी कोणते आहे, ते मला सांगता येऊ लागले आहे. त्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारांच्या समवेत नामजप करण्यास सांगतो. ‘तपासणीसाठी येणार्या बहुतेक रुग्णांना ‘श्री हनुमते नमः ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ यांपैकी कोणत्यातरी एका जपाची आवश्यकता असते’, असे माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळे मी रुग्णांना त्यांच्या भ्रमणभाषमध्ये ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ‘ॲप डाऊनलोड’ करून देऊन लगेच नामजप लावण्यास सांगतो. ‘हा जप २४ घंटे बारीक आवाजात तुमच्याजवळ लावून ठेवा आणि त्या समवेत तुम्हीही जप करा. ‘मीही माझ्याजवळ जप लावला आहे’, असे त्यांना दाखवतो.
५ आ. रुग्ण रुग्णालयात भरती (वॉर्डमध्ये ॲडमिट) असतांना रुग्णाच्या इष्टदेवतेचा जप ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर सतत लावून ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे तो नामजप त्यांच्या अंतर्मनात जातो.
५ इ. शस्त्रक्रिया करतांना रुग्णाला नामजप करायला सांगून त्याच्या कानापाशी भ्रमणभाषवर जप लावून ठेवणे : शस्त्रक्रिया करतांना रुग्णाच्या अंतर्मनात नामजप पोचवण्याची एक संधी मला मिळते. शस्त्रक्रियेसाठी रुग्णाने त्याचा देह निःसंकोचपणे माझ्या स्वाधीन केलेला असल्यामुळे त्याच्या बाह्यमनात गोंधळ नसतो. त्या वेळी त्याचे अंतर्मन अधिक ग्रहणशील असते. त्याचा लाभ घेऊन मी रुग्णाला ‘त्याची इष्टदेवता किंवा उपास्यदेवता कोणती आहे ?’, हे विचारतो आणि त्या देवतेचा जप आम्ही दोघेही प्रथम मोठ्याने ५ वेळा करतो. त्यानंतर रुग्णाला मनातल्या मनात तो नामजप करायला सांगतो. शस्त्रक्रिया चालू असतांना अधून-मधून रुग्णाला ‘तुमचा नामजप चालू आहे का ?’, असे विचारून त्याला नामजपाची आठवण करून देतो. त्याचा इष्टदेवतेचा जप ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर असेल, तर त्याच्या कानाजवळ बारीक आवाजात संपूर्ण शस्त्रकर्म होईपर्यंत नामजप लावून ठेवतो.
५ ई. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ‘इष्टदेवतेच्याच कृपेने शस्त्रकर्म व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडले आहे. तुमच्यावर इष्टदेवतेची कृपा आहे’, असे रुग्णांना सांगून त्यांची श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करतो.
५ उ. रुग्णांना रुग्णालयातून सोडतांना (डिस्चार्ज होतांना) इष्टदेवतेचा लघुग्रंथ भेट देणे : रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडतांना (डिस्चार्ज देतांना) ‘गूगल’वर त्यांचा अभिप्राय घेतला जातो. त्यामध्ये रुग्णालयामध्ये सुधारणा करण्याविषयी माहिती मिळते. त्या वेळी रुग्णांना त्यांच्या इष्टदेवतेची उपासना करण्यासाठी त्या देवतेचा लघुग्रंथ त्याला भेट म्हणून दिला जातो. रुग्णाला ग्रंथ भेट देतांना मी आणि रुग्ण मोठ्याने ५ वेळा त्या देवतेचा जप करतो अन् त्यांना आग्रहाने ग्रंथ वाचण्याची विनंती करतो.
५ ऊ. ‘श्रीकृष्णाच्याच कृपेने शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली आहे’, याची रुग्णांना जाणीव करून देणे : शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे रुग्णाची माझ्यावरील श्रद्धा वाढलेली असते. खरेतर कर्ता करविता श्रीकृष्ण असतो; पण श्रेय मला मिळते. त्यामुळे ‘माझ्या बोलण्याचा रुग्णाला लाभ होईल’, असे मला वाटते. बाह्य रुग्ण विभागात लावलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राला नमस्कार करून ‘त्याच्याच कृपेने सर्वकाही निर्विघ्नपणे पार पडले आहे’, या सत्याची जाणीव मी स्वतःला आणि रुग्णाला करवून देऊन कृतज्ञता व्यक्त करतो.
६. प्रार्थना आणि कृतज्ञता
प्रत्येक रुग्णालय हे लोकांना साधना आणि धर्मशिक्षण शिकवण्याचे माध्यम बनावे, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे. कर्ता-करवित्या श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !
– डॉ. रवींद्र भोसले, एम्.बी.बी.एस्. आणि एम्.एस्. (शल्यकर्म तज्ञ), नगर (१०.४.२०२२)
स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय यांच्या निमित्ताने संपर्कात येणार्यांना साधना सांगितल्याची उदाहरणे असल्यास त्यांच्याविषयी सविस्तर माहिती कळवा !साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती ‘काहींना धर्मप्रसारासाठी घरोघरी जाणे शक्य होत नाही; परंतु ते त्यांची नोकरी किंवा व्यवसाय यांच्या निमित्ताने संपर्कात येणार्या व्यक्तींना साधना सांगून समष्टी साधना करतात. डॉ. रवींद्र भोसले यांनी केलेले प्रयत्न, हे याचेच एक उदाहरण होय. अशी उदाहरणे तुमच्या माहितीत असल्यास किंवा तुम्ही स्वतः याप्रमाणे समष्टी साधना करत असाल, तर त्याविषयीची माहिती आम्हाला अवश्य कळवा. ‘आपले प्रयत्न जास्त नाहीत, तर कसे पाठवायचे ?’, असा विचार करून थांबू नका. तुमच्याकडून असे थोडे जरी प्रयत्न होत असल्यास तेही कळवा. ही माहिती सनातन प्रभातच्या नियतकालिकांत, तसेच सनातनच्या ग्रंथांत छापता येईल. यामुळे इतरांनाही साधना करण्याची प्रेरणा मिळेल. माहिती पाठवतांना स्वतःचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, साधनेसंबंधी केलेली कृती आणि आलेल्या अनुभूती अशा स्वरूपात पाठवावी. माहिती कळवण्यासाठी पत्ता : वैद्य मेघराज पराडकर, २४/ब, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ई-मेल पत्ता : sankalak.goa@gmail.com (ई-मेलमध्ये विषय (Subject) लिहिण्याची सोय असते. त्या ठिकाणी ‘नोकरीच्या / व्यवसायाच्या निमित्ताने संपर्कात येणार्यांना साधना सांगितल्याचे उदाहरण’ असे लिहावे.) |