‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही पाश्चात्त्य विकृती भारतातून हद्दपार करणे, हीच ‘श्रद्धा’ला खरी श्रद्धांजली ठरेल !
(विवाह न करता पती-पत्नीप्रमाणे एकत्र रहाण्याच्या विदेशी संकल्पनेला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हटले जाते.)
देहलीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशातील वातावरण ढवळले आहे. आफताब अमीन पूनावाला याने त्याच्या समवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या श्रद्धा वालकर या २७ वर्षीय हिंदु युवतीची निर्घृणपणे हत्या केली. श्रद्धाचे ३५ तुकडे करणार्या आफताबचे वास्तव हळूहळू समोर येत आहे. आफताबने मृतदेहाचे तुकडे करून १८ दिवस ते शीतकपाटात ठेवले आणि देहलीच्या वेगवेगळ्या भागांत एक एक करून फेकून दिले. या हत्येचा आफताबला कोणताही पश्चात्ताप नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या संपूर्ण हृदयद्रावक घटनेचा जितका निषेध करू तितका तो अल्पच आहे.
१. आफताबला दिलेल्या संधीमुळे श्रद्धाचा क्रूरतेने अंत !
‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात असतांना श्रद्धाला आफताबने अनेक वेळा मारहाण केल्याचे समोर येत आहे. २ वर्षांपूर्वी श्रद्धाने तिच्या मित्राला ‘आफताब कशा पद्धतीने छळ करत आहे’, हे सांगितले होते. आफताबच्या विरोधात तिने पोलिसांत तक्रारही प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र आफताबने श्रद्धाला यापुढे चांगले वागण्याचे आश्वासन देऊन तक्रार न करण्यास भाग पाडले. श्रद्धा आफताबच्या बोलण्याला भुलली आणि जिवानिशी गेली. आफताबला सुधारण्यासाठी संधी देण्याच्या नादात तिने स्वत:ची सुटका करून घेण्याची महत्त्वाची संधी गमावली आणि आफताबने मिळालेल्या संधीचा श्रद्धाची क्रूरपणे हत्या करून लाभ करून घेतला.
२. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता देणार्या कायदेशीर तरतुदींविषयी विचार करण्याची आवश्यकता !
विदेशात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. विवाहानंतर एकमेकांची मते जुळणार कि नाही ? हे पडताळण्यासाठी काही काळ एकत्र राहिले जाते. सर्वाेच्च न्यायालयाने १५ वर्षांपूर्वी अन्य एका प्रकरणात निर्णय देतांना ‘प्रौढ झाल्यानंतर व्यक्ती कुणासमवेतही रहाण्यास किंवा विवाह करण्यास स्वतंत्र आहे’, असे सांगितले होते. न्यायालयाचे म्हणणे आहे की, रिलेशनशिपमध्ये रहाणे गुन्हा नाही. असे असले, तरी श्रद्धा हत्याकांड प्रकरणानंतर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता देणार्या कायदेशीर तरतुदींविषयी पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे.
३. पुरो(अधो)गाम्यांकडून जाणीवपूर्वक आफताबच्या कृत्याचे समर्थन !
श्रद्धा हत्याकांड प्रकरणानंतर अनेकांनी मत प्रदर्शन केले. यामध्ये काही पुरो(अधो)गाम्यांनी ‘श्रद्धाचे आई-बाबा विभक्त होते, त्यांच्या भांडणाचा तिच्या मनावर परिणाम झाला होता’, असे म्हटले आहे. त्यांचे हे मत आफताबच्या क्रूर कृत्याचे समर्थन करणारेच आहे. खोट्या प्रेमाच्या नावाखाली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या श्रद्धाचा नाहक मृत्यू झाला. आफताबचे श्रद्धावर खरेच प्रेम असते, तर त्याने तिची हत्या केलीच नसती. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे समथर्न करणारे श्रद्धाच्या हत्येचे दायित्व घेणार का ? श्रद्धाच्या हत्येविषयी मतप्रदर्शन करतांना ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या दोन्हींच्या दुष्परिणामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पुरो(अधो)गामी तिच्या आई-वडिलांच्या कलहाचे कारण समोर आणत आहेत, हे लक्षात घ्या.
४. देहली सरकारने निर्भया प्रकरणातून कोणता बोध घेतला ?
देहलीमध्ये १० वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडले. (डिसेंबर २०१२ मध्ये एका युवतीवर देहलीत चालत्या बसमध्ये अमानुषपणे सामूहिक बलात्कार केल्यानंतर ती मृत्यूमुखी पडली. या युवतीच्या प्रकरणाला ‘निर्भया’ असे नाव देण्यात आले.) त्यानंतर जो वादंग उठवला गेला, तो श्रद्धा वालकर प्रकरणात दिसला नाही. समाजाच्या भावना मरत चालल्या आहेत का ? देहलीमध्ये १० वर्षांनंतरही महिलांसाठी सुरक्षित वातावरण नाही, हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. असे असेल, तर देहली सरकारने निर्भया प्रकरणातून कोणता बोध घेतला ? ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे समर्थन करणारे श्रद्धा हत्याकांड प्रकरणात काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या. या प्रकरणाविषयी अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत; मात्र त्यावर कठोर उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढे येतांना दिसत नाही.
५. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही पाश्चात्त्य विकृती समाजोपयोगी कशी ?
‘स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांचा आदर करणे’, हेच भारतीय संस्कृती शिकवते. महान आणि प्राचीन हिंदु धर्मामध्ये ‘स्त्री’ला मानाचे स्थान दिलेले आहे. पूर्वीच्या काळात अनेक स्त्रियांनी राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. तरीही त्यांनी कुठेही नीतीमूल्ये आणि संस्कार यांचा त्याग केला नाही; म्हणूनच त्यांचा इतिहास शेकडो वर्षांनंतरही अभ्यासला जातो. त्यामुळे ‘रुढी, परंपरा या बुरसटलेल्या आहेत’, असे म्हणणे उचित ठरणार नाही. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही पाश्चात्त्य विकृती एका निरागस श्रद्धाचा जीव वाचवू शकली नाही, ती समाजोपयोगी आहे किंवा तिने लाभ होईल, असे कसे म्हणता येईल ?
६. धर्माचे पालन केल्यास धर्म तुमचे रक्षण करण्यास समर्थ !
सध्याच्या युवा पिढीला धर्मपालन म्हणजे एक प्रकारचे बंधन वाटते. त्यामुळे ‘लिव्ह इन’सारखे मार्ग निवडले जातात. खरेतर धर्माचे पालन केल्यास धर्म तुमचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. आता काही जणांना वाटेल, ‘हे कसे शक्य आहे ?’ ज्याप्रमाणे ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्याविना जोडीदाराचा स्वभाव कळू शकत नाही’, असे प्रेयसींना वाटते, त्याचप्रमाणे धर्मपालन केल्याविना धर्म कसे रक्षण करतो, हे अनुभवता येणार नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल.
७. एकाही मुसलमान नेत्याने ‘श्रद्धा’च्या हत्येविषयी साधा निषेध का नोंदवला नाही ?
‘श्रद्धा’ या हिंदु युवतीची अमानवीय हत्या करणार्या आफताब पूनावाला याचे भारतातील अनेक धर्मांधांकडून समर्थन केले जात आहे. ही भारतातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. मुसलमान समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणारा एकही मुसलमान नेता ‘श्रद्धा’च्या हत्येविषयी हळहळ व्यक्त करणे तर दूरच; पण साधा निषेधही नोंदवत नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी साधा निषेध व्यक्त का केला नाही ? याविषयी कुणी विचारण्याचे धाडसही करत नाही.
८. श्रद्धाला खरी श्रद्धांजली !
हिंदूंनो, यापुढे एकाही हिंदु युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी हिंदु मुलींच्या जिवावर उठलेला ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ संमत करण्याच्या मागणीचा जोर धरा. कसलाही शास्त्राधार नसलेली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही पाश्चात्त्य विकृती भारतातून हद्दपार करण्यासाठी सरकारकडे कायदा करण्यासाठी मागणी करायला हवी. हिंदूंना लहानपणापासून धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी शिक्षणव्यवस्थेत तशी तरतूद करण्यात यावी. या मागण्यांसाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा ‘श्रद्धा’साठी खरी श्रद्धांजली ठरेल.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर (२१.११.२०२२)
संपादकीय भूमिकाहिंदु युवतीची अमानवीय हत्या करणार्या आफताबचे धर्मांधांकडून समर्थन केले जाणे . ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. |