वैराग (जिल्हा सोलापूर) येथे गोरक्षकांनी वाचवले ५० गोवंशियांचे प्राण !
४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
वैराग (जिल्हा सोलापूर) – वैराग ते तुळजापूर मार्गावर असलेल्या वैराग जवळील उस्मानाबाद चौकात ४५ जिवंत आणि ६ मेलेली वासरे अशी एकूण ५१ वासरे, २ मोठ्या जर्सी गायी अन् ३ पांढर्या रंगाचे बैल एका ‘पिकअप’ आणि टेंपोमध्ये अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. २५ नोव्हेंबर या दिवशी त्या माहितीच्या आधारे गोरक्षक अक्षय कांचन, आदित्य मदने, हृषीकेश कामथे आदींनी सतर्कतेने गोवंशियांची तस्करी करणार्या चारचाकी वाहनांचा पाठलाग करत ५० गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी वाहनांची पहाणी केली असता सर्व गोवंशियांना दाटीवाटीने बांधल्याचे आढळले. याविषयी गोरक्षक अक्षय कांचन यांनी वैराग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी वाहनांची पहाणी करून दोन्ही वाहने आणि जनावरे असा ४ लाख १ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे. या प्रकरणी टेंपोचालक अन्सार शेख, सोनू शेख, तसेच टेंपोमालक हसीन सौदागर आणि जनावरांचा मालक बाबा कुरेशी अन् अज्ञात ‘पिकअप’चालक यांच्या विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई करण्यासाठी वैराग पोलीस ठाणे येथील पोलिसांचे सहकार्य लाभले. या वेळी सर्व गोवंशियांना सोलापूर-बार्शी रस्त्यावरील ‘अहिंसा’ गोशाळेत सोडण्यात आले. (गोवंशीय किंवा त्यांचे मांस यांची अवैध ने-आण झाली नाही, असा एकही दिवस जात नाही. गोवंशियांची हत्या होते, गोतस्करी होते, गोवंशियांची अवैध वाहतूक होते. कित्येकदा गोरक्षक आणि गोतस्कर यांच्यात हाणामारी अथवा चकमक होऊन गोरक्षकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही झाल्यासच या समस्या सुटतील. – संपादक)