‘२६/११’च्या आक्रमणात वीरमरण आलेले सैनिक आणि पोलीस यांना राज्यपाल, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई – २६ नोव्हेंबर २००८ दिवशी पाकिस्तानधार्जिण्या आतंकवाद्यांनी मुंबईवर केलेल्या आक्रमणात वीरमरण आलेले सैनिक आणि पोलीस अधिकारी यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील स्मारकाच्या ठिकाणी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी सर्वांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली.
या आक्रमणाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानमधून आलेल्या १० आतंकवाद्यांनी पोलीस जिमखाना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा रुग्णालय, नरिमन हाऊस, हुतात्मा स्मारक, गेट वे ऑफ इंडिया आदी ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या आक्रमणात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ३४ विदेशी नागरिकांचाही समावेश होता. ७०० हून अधिक जण घायाळ झाले होते. आतंकवाद्यांच्या या आक्रमणात १८ पोलिसांना वीरमरण आले.