पुणे जिल्ह्यातील ३ सहस्र प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडले !
बारामती (पुणे) – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन निधीअभावी रखडले आहे. दिवाळीपूर्वीचे वेतन १ मासानंतर मिळाले. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ३ सहस्र शिक्षकांना अद्यापही दिवाळीचे वेतन मिळाले नसल्याने निराशा आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे वेतन १ तारखेला देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. शासनानेही वेळेवर वेतन होण्यासाठी सी.एम्.पी. प्रणाली चालू केली आहे, असे असतांनाही वेतन वेळेवर देण्यास सरकार अपयशी ठरत आहे. दिवाळीनंतर जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी १० तालुक्यांतील शिक्षकांचे वेतन दिले असून बारामती, खेड आणि दौंड या ३ तालुक्यांतील शिक्षकांच्या वेतनाचे वितरण अद्यापही करण्यात आले नाही. पुणे जिल्हापरिषदेला शिक्षकांच्या वेतनासाठी प्रतिमास ९० कोटी रुपयांची आवश्यकता असते. या मासामध्ये केवळ ५५ कोटींचा निधी मिळाला आहे. (एवढ्या निधीमध्ये सर्वांचे वेतन कसे दिले जाणार ? सरकारने यावर लवकरात लवकर उपाययोजना काढावी, हीच अपेक्षा ! – संपादक)
बाळासाहेब मारणे म्हणाले की, राज्य सरकार आणि जिल्हापरिषद यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुरेशी तरतूद उपलब्ध होत नाही. हे शिक्षण विभागाचे अपयश असून राज्यव्यापी आंदोलनाविना पर्याय नाही.
संपादकीय भूमिकाशिक्षकांना वेळेत वेतन देण्याचे नियोजन प्रशासनाने का केले नाही ? महागाईच्या काळात वेळेत वेतन न मिळाल्यामुळे निराश झालेले शिक्षक मुलांना उत्साहाने कसे शिकवणार ? प्रशासनाने याचा विचार करून शिक्षकांच्या वेतनाची समस्या सोडवावी ! |