पुणे विद्यापिठाच्या अथर्वशीर्षाविषयी अभ्यासक्रमाला प्रा. हरि नरके यांचा विरोध !
मुंबई – संस्कृत भाषेविषयी गोडी निर्माण होण्यासाठी पुणे विद्यापिठाने अथर्वशीर्षाविषयी चालू केलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला हिंदुद्रोही प्रा. हरि नरके यांनी विरोध केला आहे. त्यांनी विरोध करतांना म्हटले आहे की, पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्ने ही सनातन मंडळी रंगवत आहेत. हे धोकादायक आहे. हा उलट्या पावलांचा प्रवास आहे. संस्कृतमध्ये अनेक सुंदर आणि मौलिक ग्रंथ आहेत, ते शिकवण्याऐवजी अभ्यासकांच्या मतानुसार संस्कृतची गोडी लागण्यासाठी, तसेच मन:शांती आणि व्यक्तीमत्त्व विकासासाठी अलीकडील असलेले अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात घेणे कितपत योग्य आहे ? राज्यघटनेच्या कलम ५१ चे पालन करण्याऐवजी एका धर्माचे लेखन विद्यापिठाकडून शिकवणे, विद्यापिठाच्या स्वाक्षरी-शिक्क्याचे प्रमाणपत्र देणे हा निर्णय चुकीचा आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे. उद्या पुढचे पाऊल म्हणून आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक्रम बंद केले जातील.
(प्रा. नरके यांच्यासारख्या हिंदु धर्मशास्त्राला विरोधासाठी विरोध करणार्यांमुळेच खरेतर राज्य अधोगतीला जात आहे. हिंदूंमध्ये विद्या, कला आणि कोणत्याही कार्याचा आरंभ श्री गणेशाला वंदन करूनच होतो. त्यामुळे संस्कृतची गोडी निर्माण करण्यासाठी गणेश अथर्वशीर्षाने प्रारंभ होणे हा अभिनंदनीय निर्णय आहे. – संपादक)
प्रा. नरके यांना विरोध करतांना ब्राह्मण महासंघाने ‘ऊर्दू प्रार्थना चालते, तर अथर्वशीर्ष का नको ?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आराधना धार्मिक कशी असू शकते ? – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
हा अभ्यासक्रम बंधनकारक नाही. ज्यांना नको आहे, त्यांनी त्यासाठी प्रवेश घेऊ नये. आराधना धार्मिक कशी असू शकते ?
संपादकीय भूमिकाश्रद्धाळू आणि बहुसंख्य हिंदू असलेल्या महाराष्ट्रात श्री गणेश अथर्वशीर्षाला विरोध होणे, ही राज्याची नास्तिकतेकडे वाटचाल नाही का ? पाकिस्तानमध्ये कधी कुराण आणि अमेरिकेत बायबल शिकवण्यास विरोध होणार का ? हिंदु सहिष्णु असल्याने त्यांच्या प्रत्येक कृतीला विरोध केला जात आहे ! |