पुण्याला सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे ! – उदय लळीत, माजी सरन्यायाधीश
पुणे – पुणे शहराविषयीचे मला कायमच आकर्षण राहिले आहे. माझ्या आई-वडिलांचे शिक्षण येथेच झाले. माझे आजोळही सदाशिव पेठेत होते. पुण्याला मोठा सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी असून, पुण्यात आज जो विचार होतो, तो उद्या देशात होतो; मात्र मी पुण्यात शिकू शकलो नाही, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी बोलून दाखवली. ते पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि ‘पुणे बार असोसिएशन’च्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अशोका हॉल’मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
लळीत पुढे म्हणाले की, अशा या पुण्यनगरीत सामाजिक देवाणघेवाणीतून उद्भवणार्या वादात प्रतिनिधित्व करण्याची संधी अधिवक्त्यांना मिळते, हे त्यांचे सुदैव आहे. अधिवक्ता हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणार्या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात ? त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे. राज्यघटनेत ‘विधी सेवा’ या केवळ एकाच व्यवसायाचा उत्कटतेने उल्लेख करण्यात आला आहे, ही अधिवक्त्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.