पाश्चात्त्य देशांनी भारताचे परराष्ट्र धोरण स्वीकारावे !
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे रशिया-युक्रेन संघर्षावरून कणखर प्रतिपादन !
नवी देहली – मी अन्य लोकांच्या (पाश्चात्त्य देशांच्या) मागण्यांनुसार परराष्ट्र धोरण आखत नाही. माझे परराष्ट्र धोरण हे माझा देश आणि माझे नागरिक यांच्या हितासाठी आहे. भारताने काही वेळा पाश्चात्त्यांच्या मतानुसारही धोरण आखले आहे. त्यामुळे आता त्यांनीही भारताचे धोरण स्वीकारले पाहिजे, असे कणखर प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना केले. रशिया-युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धावर भारताने एका पक्षाची बाजू घेतली पाहिजे, अशी पाश्चात्त्य देशांची आग्रही मागणी आहे. त्यावर भारताने कुणाचीही स्पष्ट बाजू घेतलेली नाही. याविषयी जयशंकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
१. डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, भारताचे हित चांगल्याप्रकारे साध्य झाले आहे, असे मी समजतो. आम्ही नेहमीच सार्वभौमत्वाचा पुरस्कार केला आहे आणि संघर्षाला पूर्णविराम मिळावा, असे आम्हाला वाटते. मी जर अमेरिकेनुसार आमची भूमिका मांडली असती, तर त्याचा माझ्यासह अन्य कुणालाही उपयोग झाला नसता.
२. पाकिस्तान हे जिहादी आतंकवादासाठी सुरक्षित ठिकाण असल्याचे मान्य करत ते म्हणाले की, कोणत्याही विषयावर २ देशांमध्ये एकमत असणे अशक्य असते. जग हे कठीण ठिकाण असून भारतासाठीही ते सोपे नाही.
३. त्यांनी मागील सरकारांवर अप्रत्यक्ष टीका करतांना म्हटले की, वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धात आपला पराभव झाला. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या परिसरातील जो भाग आपण गमावला, आज तेथे गावे उभारली जात आहेत.