साहित्यिकांची वैचारिक दिवाळखोरी !
साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आणि सुमारे २५० साहित्यिकांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला समर्थन दर्शवले आहे. राहुल गांधी यांची भेट घेऊन लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा सातत्याने होत असलेल्या अयोग्य वापरामुळे देशातील लेखक आणि साहित्यिक यांना गुदमरल्यासारखे वाटत आहे’, असे सांगितले.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी ते कन्याकुमारीमध्ये असतांना कॅथॉलिक पाद्री जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ‘येशू ख्रिस्त हेच एकमेव भगवान आहेत. इतर कोणतेही देवता किंवा देवी (शक्ति) नाहीत’, असे सांगितले होते. याचा अर्थ राहुल गांधी एखाद्या हिंदुद्वेषी पाद्रयाची भेट घेतात आणि ते वरीलप्रमाणे दावा करतात, तेव्हा लेखकांना गुदमरल्यासारखे होत नाही, तर हिंदुत्वाचा विषय आल्यावर मात्र देशमुख यांच्यासारख्यांना गुदमरल्यासारखे होते, हे अनाकलनीय आहे. ज्या काँग्रेसचा आज देशमुख उदोउदो करत आहेत, त्यांच्याच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून सामान्यांसह लेखकांच्या लेखणीवर नाही, तर जगण्यावरही गदा आणली होती, त्याविषयी देशमुख किंवा त्यांच्या सहकार्यांना कधी एकाधिकारशाही वाटली नाही, हे दुर्दैवी !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एक साहित्यिक म्हणून केलेले कार्य अनमोल आहे. अशा लेखक, साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी अनुद्गार काढतात, तेव्हा देशमुख किंवा त्यांच्या कंपूतील सहकार्यांना गुदमरल्यासारखे होत नाही किंवा त्याविषयी ते अवाक्षरही काढत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांना देशमुख यांच्या कंपूने पाठिंबा देणे, ही लेखकांची वैचारिक दिवाळखोरी आहे. साहित्य संमेलन आणि अनेक प्रसंगात मराठीची गळचेपी यांवर न बोलता केवळ ‘धार्मिक उन्माद, ध्रुवीकरण’ असे शब्द वापरून देशमुख हे मूळ विषयावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या कंपूचे मराठीसाठी विशेष योगदान नाही आणि केवळ ‘हिंदुत्वा’ला लक्ष्य करण्यासाठी राहुल यांच्या राजकीय यात्रेला पाठिंबा देतात, अशा कथित साहित्यिकांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला. मराठी जनांनीही या पुढील काळात अशा बेगडी साहित्यिकांना या कृतीसाठी जाब विचारण्याची योग्य संधी मिळाल्यावर सोडता कामा नये, इतकेच !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर