साधकांना प्रेमाने साधना करायला उद्युक्त करणार्या आणि हिंदुत्वनिष्ठांना प्रेमाने जोडून ठेवणार्या नवे पारगाव (वारणानगर, जिल्हा कोल्हापूर) येथील आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) !
नवे पारगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांची निपाणी येथील साधक श्री. प्रसाद श्रीपाण्णावर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. शांत आणि स्थिर
‘आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे या अतिशय शांत आहेत. कितीही धावपळीची सेवा असली, तरीही त्यांच्या तोंडवळ्यावर कधीही ताण जाणवत नाही. प्रत्येक प्रसंगाला त्या शांतपणे सामोरे जातात.
२. सेवा परिपूर्ण करणे
शिल्पाताई अभ्यासपूर्ण सेवा करतात. त्यांनी सत्संगात मांडलेली सूत्रेही अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण असतात.
३. साधकांशी अधिकारवाणीने न बोलता प्रेमाने मार्गदर्शन करणे
साधकांना असणारे ‘आध्यात्मिक त्रास आणि त्यांच्या कौटुंबिक समस्या’ यांविषयी त्यांचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक असतो. त्या साधकांना अतिशय प्रेमाने त्यांच्या समस्यांवरचे उपाय सांगतात आणि ‘उपाय सांगितल्यावर संबंधित साधकाने त्याप्रमाणेच वागले पाहिजे’, असा त्यांचा कधीही आग्रह नसतो. त्या कधीही अधिकारवाणीने बोलत नाहीत. जिल्ह्यातील सर्व साधकांना त्या एक प्रेमळ आणि आपल्या कुटुंबातील मार्गदर्शक वाटतात.
४. आधुनिक वैद्य आणि सुखवस्तू घराण्यातील असूनही पूर्णवेळ साधना अन् सेवा करण्याचा निर्णय घेणे आणि त्यातून ‘साधनेसाठी त्याग कसा करायचा ?’, हे साधकांना शिकायला मिळणे
त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्या मोठे रुग्णालय उभारून वैद्यकीय व्यवसाय करू शकल्या असत्या किंवा त्या एका समृद्ध कुटुंबातील असल्यामुळे सुखासीन जीवनही जगू शकल्या असत्या; पण त्यांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.
५. धर्मप्रसाराच्या सेवेसाठी अपार कष्ट घेणे
त्यांना धर्मप्रसाराच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात फिरावे लागते. त्या आमच्या निपाणी गावातही येतात. त्या कित्येकदा वारणानगर ते निपाणी हे जवळजवळ ८० कि.मी.चे अंतर स्वतः चारचाकी चालवत आल्या आहेत. त्यांना पुष्कळ वेळा अनेक घंटे सेवा करावी लागते; पण त्यात त्या कधीही सवलत घेत नाहीत. विश्रांती अल्प मिळाल्यामुळे काही वेळा त्यांची प्रकृती बिघडते; पण तरीही त्या ‘ऑनलाईन’ सत्संगांना वेळेवर उपस्थित रहातात.
६. स्थिर राहून साधकांकडून झालेल्या चुकांची प्रेमाने जाणीव करून देणे आणि चांगल्या सेवेचे कौतुकही करणे
प्रसार करतांना अपेक्षेप्रमाणे कार्य झाले नाही, तरीही त्या अस्वस्थ होत नाहीत. जे कार्य झालेले असते, त्याविषयी त्या साधकांचे कौतुक करतात आणि सेवेत झालेल्या चुका साधकांना शांतपणे सांगून ‘पुढील वेळी त्या चुका टाळण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, ते नेमकेपणाने सांगतात. त्या साधकांकडून लिखितस्वरूपात सेवेचे नियोजन सिद्ध करवून घेतात आणि अधिकाधिक फलनिष्पत्ती मिळण्याच्या दृष्टीने करायचे प्रयत्न साधकांना सांगून तसे त्यांच्याकडून तसे प्रयत्नही करवून घेतात.
७. शिल्पाताईंनी धर्मप्रेमी, हितचिंतक, विज्ञापनदाते, आधुनिक वैद्य, अधिवक्ते आणि विविध हिंदुत्वनिष्ठ यांना सनातन संस्थेशी जोडून ठेवणे, त्यांच्या सर्वांशी आदरयुक्त वागण्यामुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये त्यांच्याविषयी आदरभाव असणे
त्या समाजातील धर्मप्रेमी, हितचिंतक, विज्ञापनदाते, आधुनिक वैद्य, अधिवक्ते आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून त्यांना साधनेचे महत्त्व पटवून देतात. त्यांच्या या कौशल्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धर्मप्रेमी, हितचिंतक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते एका छत्राखाली येऊन धर्मासाठी कार्य करत आहेत. काही कार्यकर्त्यांनी साधनाही चालू केली आहे. हिंदुत्वनिष्ठांमध्ये त्यांच्याप्रती पुष्कळ आदरभाव आहे.
८. ‘जिल्ह्यातील सर्व साधकांची साधना व्हावी आणि धर्मकार्य वाढावे’, या दृष्टीने आणि ‘सर्वांना सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करून घेता यावा’ यासाठी प्रयत्न करणे
सद्गुरु स्वाती खाड्ये (सद्गुरु स्वातीताई) या कोल्हापूर जिल्ह्यात साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी येतात. ‘जिल्ह्यातील साधकांना त्यांच्या मार्गदर्शनाचा अधिकाधिक लाभ मिळावा’, यासाठी त्या नेहमी प्रयत्न करतात. त्या अनेकदा सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत विविध ठिकाणी प्रसाराला जातात. तेव्हा ‘जिल्ह्यात धर्मकार्य वाढावे, साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि ‘साधकांना त्यांचा अधिकाधिक लाभ करून घेता यावा’, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असतात. शिल्पाताईंच्या मनात सद्गुरु स्वाती खाडये यांच्याप्रती असलेला भाव पदोपदी जाणवतो.
९. अनुभूती – प्रार्थना करून आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पाताई यांच्याविषयी सूत्रे लिहायला आरंभ केल्यावर काही मिनिटांच सूत्रे लिहून पूर्ण होणे
‘आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पाताई यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लिहावीत’, हा विचार गुरुकृपेनेच माझ्या मनात आला; पण ‘दीर्घकाळ मराठी लेखनाचे हिंदीमध्ये भाषांतर करण्याची सेवा केल्याने मला मराठीत लिखाण करायला जमेल का ?’, असे मला वाटत होते. ‘मला हे लिखाण करण्याचा विचार तुम्हीच (गुरुदेवांनी) दिला आहे आणि तो आपल्या अपेक्षेनुसार आपणच माझ्याकडून करवून घ्या’, अशी प्रार्थना केल्यावर ‘केवळ काही मिनिटांतच ही सूत्रे मला लिहिता आली’, ही परात्पर गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) मोठी कृपा आहे. धन्य ती परात्पर गुरुमाऊली !’
‘हे गुरुदेवा, आपण आणि आम्ही साधक यांमधील शिल्पाताई या दुवा आहेत. त्यांच्या माध्यमातून आपणच आम्हाला मार्गदर्शन करत आहात आणि आमच्याकडून सेवा करवून घेत आहात. ही आपली पुष्कळ मोठी कृपा आहे. आपण त्यांच्यासारखे अनेक साधक घडवले आहेत. यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! हे गुरुदेवा, आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पाताई यांच्याकडून आम्हा साधकांना सतत प्रेरणा मिळत राहो आणि त्यांच्याप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न होवो, ही आपल्या कोमल चरणी प्रार्थना !’
– श्री. प्रसाद श्रीपाण्णावर, निपाणी, जिल्हा बेळगाव. (२६.८.२०२१)