‘सेवा हाच प्राण’ असलेल्या म्हापसा (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ !
‘वर्ष २००५ ते २०११ या कालावधीत मला सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्यासह सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. उत्साही : पूर्वी ताई पणजी येथे रहात होत्या. (आता त्या म्हापसा येथे रहातात.) तेव्हा त्या प्रतिदिन पणजीहून सकाळी १० वाजेपर्यंत आश्रमात सेवेसाठी यायच्या आणि संध्याकाळी ७ वाजता घरी जायच्या. ताई प्रवास करून आश्रमात आल्यावर ‘त्या थकल्या आहेत’, असे कधी वाटायचे नाही. त्यांच्या तोंडवळ्यावर नेहमी उत्साह जाणवायचा.
२. त्यांच्यामध्ये ‘काटकसरीपणा, नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा’, हे गुण आहेत.
३. प्रेमभाव
अ. एकदा माझ्या सासूबाई १५ दिवस पणजी येथील रुग्णालयात होत्या. मी दिवसभर सासूबाईंच्या समवेत रुग्णालयात थांबत होते. मीनाक्षीताईंचे घर रुग्णालयाच्या जवळच होते; म्हणून माझे यजमान रात्री मला त्यांच्या घरी पोचवायचे आणि ते रुग्णालयात सासूबाईंच्या जवळ थांबायचे. तेव्हा मीनाताई मला ‘हवे-नको’, ते विचारून माझी काळजी घ्यायच्या.
आ. माझे यजमान रुग्णालयात झोपायचे. तेव्हा मीनाताई त्यांच्यासाठीही डब्यात अल्पाहार द्यायच्या.
इ. त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे मला त्यांचे घर आश्रमासारखेच वाटले. मी आश्रमात रहाते, तशीच त्यांच्या घरी निश्चिंत राहिले.
४. त्यांना मायेची आसक्ती नाही. त्या नेहमी साधनेविषयीच बोलतात.
५. सेवेची तळमळ
अ. त्या प्रतिदिन सेवेशी एकरूप होऊन सेवा करायच्या. त्यांना सेवा करतांना तहान-भुकेची जाणीव नसायची. त्यांना सेवा पूर्ण करायचा ध्यास असायचा.
आ. त्या आश्रमातील सेवा करून घरी गेल्या, तरी त्यांची भ्रमणभाषवरून सेवा चालू असायची. त्या घरातील कामे करतांना साधकांशी भ्रमणभाषवर सेवेविषयी बोलायच्या.
इ. आम्ही त्यांना कधीही, अगदी रात्रीही सेवेतील अडचणी विचारल्या, तरी त्या आम्हाला लगेच उपाययोजना सांगायच्या. तेव्हा ‘सेवा, म्हणजे त्यांचा प्राण आहे’, असे मला जाणवायचे.
– सौ. राधा घनश्याम गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२१)