अंबरनाथ येथील गोळीबार प्रकरणी ३३ आरोपींना ‘मोक्का’ !
ठाणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – अंबरनाथ (पूर्व) येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावर १३ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या २ गटांतील गोळीबार प्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या ३३ आरोपींना ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. बैलगाडा शर्यत प्रकरणावरून ही घटना घडली होती.
बोहनोली गावात आयोजित बैलगाडा शर्यतीच्या चर्चेसाठी राहुल पाटील त्यांच्या सहकार्यांसह खासगी वाहनातून जात असतांना गुरुनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांचे साथीदार यांनी पाटील यांचे वाहन अडवून त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोळ्या झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फिर्यादीसमवेत असलेल्या इतर वाहनांची मोडतोड केल्याप्रकरणी त्या सर्वांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली होती, तर २३ जण पसार झाले होते.