भिवंडी येथे कोट्यवधी रुपयांचा पानमसाला आणि तंबाखू यांचा साठा जप्त !
ठाणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – भिवंडी येथील अंबाडी-भिवंडी रस्त्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने कारवाई केली. त्यात १ कोटी ८ लाख ९७ सहस्र ५२० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाला यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, तसेच वाहनचालकाचा परवाना रहित करण्याविषयी प्रादेशिक परिवहन विभागात पत्रव्यवहार केला जाणार आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी दिली.